ऑनलाईन टीम/तरुण भारत
शरीरातील महत्वाच्या अवयवयांपैकी यकृत म्हणजेच लिव्हर हा एक महत्वाचा अवयव आहे. तुमच्या रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यापासून ते पित्त तयार करण्यापर्यंत मदत करते. शरीराचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. तितकेच लिव्हर निरोगी ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या जीवनशैली आणि आहारामुळे यकृत व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे काही नैसर्गिक आरोग्यदायी पदार्थांच्या मदतीने यकृत निरोगी ठेवण्याचे काही उपाय पाहूयात.
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये (Green Tea) मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. जे लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यामुळे शक्य असल्यास दिवसभरात किमान २ ते ३ कप ग्रीन टी तुम्ही पिऊ शकता. पण रिकाम्या पोटी पिऊ नका.
बीटचा रस : बीटचा रस नायट्रेट्सचा स्रोत आणि बीटालेन नावाचा अँटीऑक्सिडंट आहे जो लिव्हर मधील ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो. बीटरूटचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते
द्राक्षे : आरोग्यासाठी लाल आणि जांभळी द्राक्षे अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. एक उदाहरण म्हणजे रेसवेराट्रोल जे अँटिऑक्सिडंट पातळी वाढवते आणि जळजळ कमी करते. त्यामुळे लाल आणि जांभळी द्राक्षे खाणे फायदेशीर ठरते.
गाजर : यकृत निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी गाजर (Carrot) खाणे खूप महत्वाचे आहे. गाजरात ग्लूटाथिओन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
अक्रोड : सर्व प्रकारच्या नट्सपैकी अक्रोड हे फॅटी लिव्हर रोग कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये सर्वात जास्त ओमेगा -६ आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिड तसेच पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स असतात.
कांदा : अन्नाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही कांदा फायद्याचा आहे. यात सल्फर, अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. या सर्वांमुळे यकृत निरोगी आणि स्वच्छ होण्यास मदत होते.
लसूण : लसूण हे डिटॉक्स करण्यासाठी आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. लसूणमध्ये असलेल्या अॅलिसिन अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर काढणे सोपे जाते.
लिंबू : सॅलडमध्ये किंवा डाळीत लिंबू पिळून तुम्ही अनेक वेळा खाल्ला असेल. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी सह नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास तसेच पाचनशक्ती (Digestion) वाढविण्यास मदत करतात.









