मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर : तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
इंदिरानगर, बैलहोंगल येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत. गोव्यात पडून जखमी झाल्याने हा प्रकार घडला आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.
तबसुम इरशाद सौंदत्ती (वय 20) असे तरुणीचे नाव आहे. गेल्या महिन्यापासून तबसुम बेंगळुरातील एका कॉलसेंटरमध्ये काम करीत होती. बुधवारी बसमधून ती बेळगावला आली. त्यावेळी ती अत्यवस्थ होती. एका तरुणाने तिला सिव्हिलमध्ये दाखल करून तो तेथून निघून गेला.
तबसुमचे वडील इरशाद यांना ही माहिती समजताच बुधवारी ते बेळगावात दाखल झाले. त्यांनी तिला खासगी इस्पितळात हलविले. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी तिचा मृत्यू झाला. तबसुमचा घातपात झाला आहे का? असा संशय व्यक्त झाल्यामुळे खासगी इस्पितळ आवारात कुटुंबीयांची गर्दी जमली होती. घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदींनी इस्पितळाला भेट देऊन माहिती घेतली. तबसुमला इस्पितळात दाखल करणाऱया तरुणाने गोवा गाठल्याची माहिती मिळाली.
यासंबंधी पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी, चार दिवसांपूर्वी पणजी बसस्थानकावर पडून तबसुम जखमी झाली होती. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा तपास करण्यात येत असल्याचे सांगितले.









