डेरवणच्या वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान
प्रतिनिधी/ चिपळूण
कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱया सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे मंगळवारी रात्री 10.10 वाजता येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
एकविसाव्या शतकात कोकणला आठ हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध झाले असताना काही दशकांपूर्वी ‘कोकणला प्राचीन इतिहास नाही’ हे शासकीय तज्ञांचे म्हणणे नऊ ताम्रपटांचा शोध घेत अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले होते. कोकणात ‘अपरान्त’ हा शब्द रूढ करण्यात त्यांचे मौलिक योगदान राहिले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या 60 वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम देत नोव्हेंबर 2018 पासून अण्णा चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे वास्तव्यास होते. आठवडाभरपूर्वी चिपळूण-गुहागर मार्गावरील मालघर येथे मुक्कामी होते.
1960 मध्ये दाभोळला वास्तव्यास आल्यावर अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला खतपाणी मिळाले होते. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली 75हून अधिक वर्षे ते डायरी लेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्तच्या साधनांसाठी 50हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम त्यांनी केले होते. सतत धडपडणाऱया माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासू वृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले होते.
14 पुस्तकांचे लेखन
अण्णांनी 14 पुस्तकांचे लेखन केले. 5 सप्टेंबर 1930रोजी गुहागर तालुक्यातील विसापूर येथे जन्मलेल्या अण्णांचे रितसर शालेय शिक्षण फार झाले नव्हते. त्यांच्या जीवनावर आई चंद्रभागा हिचा प्रभाव होता. आईमुळे समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन विशाल आणि उदार झाला होता. पत्नी सौ. नंदिनीकाकींच्या पश्चात 2012 नंतर वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजाला ‘अधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असायचे. अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले.
सागरपुत्र संस्थेची केली स्थापना
अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले होते. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन1983 मध्ये त्यांनी ‘सागरपुत्र विद्या विकास संस्था’ स्थापन केली होती. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली होती. ताम्रपट, लहान-मोठय़ा तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठय़ा मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदी वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता.
दोन पुस्तकांचे स्वप्न अधूरे
याही वयात अण्णांचे वाचन, लेखन, चिंतन सुरू होते. त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक विशेषांक प्रकाशित करण्याच्या ते प्रयत्नात होते. ’हा शेवटचा विशेषांक आहे’ असेही त्यांनी या विशेषांकांतील आपल्या निवेदनात म्हटले होते. अण्णांच्या मनात जीवनभर केलेल्या चिंतनाच्या आधारे शिवकाळ आणि पेशवाई या दोन विषयांवर स्वतंत्र दोन पुस्तके लिहिण्याचे विचार सुरू होते. त्यासाठीच्या संदर्भांची जुळवाजुळव सध्या ते करीत होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांनी यापूर्वी देहदान करण्याच्या व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पश्चात सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
लोटिस्मात रविवारी शोकसभा
संशोधन क्षेत्रात थोर कार्य करणाऱया अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 16 रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोटिस्माच्या बाळशास्त्राr जांभेकर सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यवाह विनायक ओक यांनी कळवले आहे.









