लक्ष्मी यात्रेनंतर पथदीप बंदावस्थेतच : लाखोचा निधी खर्चून वाया गेल्याची चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा गावादरम्यान बेळगाव-वेंगुर्ला मार्गाचे रुंदीकरण करून दुभाजक घालण्यात आले. तसेच लाखो रुपये खर्ची घालून पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र सदर पथदीप काही महिनेच सुरू ठेवण्यात आले. बंद असलेले पथदीप लक्ष्मी यात्रेदरम्यान सुरू करण्यात आले. पण त्यानंतर कधी पेटलेच नाहीत. त्यामुळे पथदीप केवळ शोभेचे बनले आहेत.
बेळगाव-वेंगुर्ला मार्ग हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध ठिकाणांच्या रस्ते रुंदीकरणासह हिंडलगा येथील आंबेवाडी क्रॉस ते श्रीनाथनगरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केले होते. येथील रस्ता 100 फुटाचा करून दुतर्फा गटारीचे बांधकाम आणि दुभाजक घालण्यात आले होते. त्याचप्रमाणे दुभाजकावर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले होते. याकरिता लाखोंचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण सध्या हे पथदीप बंद अवस्थेत असून खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नव्याने बसविण्यात आलेले पथदीप केवळ वर्षभर व्यवस्थित सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर सदर पथदीपांचे विद्युत बिल भरले नसल्याने पथदीप बंद ठेवण्यात आले होते. पथदीपांच्या बिलाची रक्कम ग्राम पंचायतीने भरावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केली होती. पण सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचा असून देखभाल बांधकाम खात्यामार्फत केली जात असल्याने विद्युत बिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीने नकार दर्शविला. त्यामुळे येथील पथदीप बंद ठेवण्यात आले होते. पण हिंडलगा गावच्या लक्ष्मी यात्रेनिमित्त विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. यावेळी पथदीप सुरू करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला असता, थकीत बिलाची रक्कम भरून पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी ग्र.पं.कडे सोपविण्यात आली होती.
लक्ष्मी यात्रेदरम्यान येथील पथदीप सुरू करण्यात आले. पण काही महिन्यांनंतर हे पथदीप बंद झाले असून मुख्य मार्गावर अंधार पसरत आहे. रस्त्याशेजारी ग्रा.पं.ने पथदीप बसविले आहेत. पण काही पथदीप बंद असून पथदीपांचा उजेड येथील रस्त्यावर पडत नाही. परिणामी रुंदीकरण केलेला हा रस्ता अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले डेकोरेटिव्ह पथदीप केवळ शोभेचे बनले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावर असलेले पथदीप सुरू करण्यासह देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.









