निष्पापांना त्रास होणार नाहीत याची काळजी घ्यावी : आमोणकर
प्रतिनिधी /मडगाव
पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या संदिग्ध कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सदर संघटनेशी संबधितांची धरपकड केल्याबद्दल तसेच पोलीस कारवाईबद्दल मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर आणि समाजसेवक शेख रियाज यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे. सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रियाज यांनी पॉप्युलर प्रंटवर 5 वर्षांची नव्हे, तर कायमची बंदी घालण्याची मागणी उचलून धरली.
सदर संघटनेच्या संदिग्ध कारवायांबद्दल काही जणांना कल्पना नव्हती. त्यांनी मुस्लिमांशी संबंधित संघटना म्हणून या संघटनेच्या सदस्यत्वाचा अर्ज भरल्याने ते सदस्य झाले होते. अशा निष्पाप मुस्लिमबांधवांना उगाच त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. आपल्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला त्यांना आपण पोलीस तुमच्याकडे चौकशीसाठी येण्याच्या आधी तुम्ही पोलिसांची भेट घेऊन तुमची बाजू स्पष्ट करा असा सल्ला दिल्याचे नगरसेवक आमोणकर यांनी सांगितले.
या संघटनेने गृहनिर्माण वसाहत व अन्य काही ठिकाणी समाजात दुही निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप रियाज यांनी केला. त्यात या संघटनेचे काही मुख्य नेते गुंतले होते. बहुतेक उपक्रम राबविण्यात व आंदोलने करण्यात जे नेते पुढाकार घेत होते त्यांची चौकशी करून कारवाई होण्याची आवश्यकता रियाज यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी दबाव आणणाऱया लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करावीत
जे अटकेत आहेत व ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांची पाठराखण करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून काही आजी-माजी आमदार पोलिसांवर दबाव आणत असल्याची माहिती मला मिळाली असून पोलिसांनी अशा लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करून त्यांना उघडे पाडावे, अशी मागणी नगरसेवक आमोणकर यांनी यावेळी उचलून धरली.









