शिवबसवनगर-नेहरुनगरमधील 31 गाळय़ांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
व्यापारी गाळय़ांच्या न्यायालयीन वादामुळे महापालिकेचा महसूल बुडाला आहे. मात्र आता महापालिकेच्या 254 गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला असून बुधवार दि. 12 ते 21 ऑक्टोबर दरम्यान लिलाव प्रक्रिया चालणार आहे. बुधवारी विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलातील 31 गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
महापालिकेचे व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी यापूर्वी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र काही गाळेधारकांनी स्थानिक आणि उच्च न्यायालयात धाव घेतल्याने लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला होता. पण युक्तिवादानंतर न्यायप्रवि÷ गाळे वगळून अन्य गाळय़ांचा लिलाव करण्यात आला होता. अडीचशेहून अधिक गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. मात्र न्यायालयीन वादामुळे लिलाव प्रक्रिया राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण गाळेधारकांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने गाळे भाडेतत्त्वावर देण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. चव्हाट गल्ली, शिवबसवनगर स्मार्ट रोडवरील गाळे, नेहरुनगर तसेच विविध ठिकाणी असलेल्या 31 गाळय़ांचा लिलाव बुधवारी होणार आहे. यामध्ये शिवबसवनगर येथील दोन गाळय़ांचा व नेहरुनगर येथील व्यापारी संकुलातील उर्वरित 28 गाळय़ांचा समावेश आहे. सदर गाळे 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. चव्हाट गल्ली वगळता प्रत्येक गाळय़ासाठी 2 लाख रुपये अनामत रक्कम व 12 हजार रुपये प्रतिमहिना भाडे निश्चित केले आहे. लिलावात भाग घेण्यासाठी संपूर्ण अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे.









