वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकचा मोहम्मद रिझवान यांनी पटकाविला. आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याला पुरुष आणि महिलांच्या विभागात त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते.

पुरुषांच्या विभागात पाकच्या मोहम्मद रिझवानने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान मिळविला आहे. महिनाभराच्या कालावधीत रिझवानची कामगिरी दर्जेदार झाल्याने तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूंच्या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये पाकचा मोहम्मद रिझवान, ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन ग्रीन आणि भारताचा अक्षर पटेल यांचा समावेश होता. पण रिझवानने ग्रीन आणि पटेल यांना मागे टाकले. मोहम्मद रिझवानने पुरुषांच्या झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत तसेच त्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत फलंदाजीत सातत्य राखले. त्याने दहा टी-20 सामन्यात 553 धावा जमविताना सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारात 69.12 धावांची सरासरी राखली. सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने सात अर्धशतके नोंदविली. या अव्वल कामगिरीमुळे आयसीसीने निर्विवादपणे रिझवानची या पुरस्कारासाठी निवड केली. नुकत्याच झालेल्या आशिया चषक अंतिम स्पर्धेत पाकने अंतिम फेरी गाठली होती. रिझवानच्या दमदार फलंदाजीमुळेच पाकला या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली. पण लंकेने त्यांचा पराभव केल्याने पाकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मोहम्मद रिझवानने भारताविरुद्धच्या सामन्यात 71 तर लंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 55 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पाकमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोहम्मद रिझवानने चार अर्धशतके नोंदविली. या मालिकेतील दुसऱया सामन्यात मोहम्मद रिझवानने कर्णधार बाबर आझमसमवेत सलामीच्या गडय़ासाठी नाबाद 88 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला दहा गडय़ांनी विजय मिळवून दिला होता. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, अशी प्रतिक्रिया मोहम्मद रिझवानने व्यक्त केली. पाकमध्ये अलीकडेच झालेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी आपण हा पुरस्कार त्यांना अर्पण करीत असल्याचे रिझवानने सांगितले.
महिलांच्या विभागात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसीचा हा पुरस्कार पहिल्यांदाच पटकावला. भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये अलीकडेच वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय महिला संघाने 1999 नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीत ही मालिका जिंकली. भारतीय संघाच्या यशामध्ये कर्णधार हरमनप्रीतचा वाटा महत्त्वाचा आहे. या मालिकेतील तीन सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 221 धावा जमविल्या. पहिल्या सामन्यात तिने नाबाद 74 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दुसऱया सामन्यात हरमनप्रीत कौरने 111 चेंडूत नाबाद 143 धावा झळकविताना 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले होते. सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये हरमनप्रीत कौर तसेच स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांचा समावेश होता. आयसीसीच्या मासिक सर्वोत्तम क्रिकेटपटू निवड पुरुषांच्या पॅनेलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीवीर डुमिनी तसेच महिलांच्या निवड समितीमध्ये ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरचा समावेश आहे.









