निम्मा काश्मीर गायब ः देशाच्या अखंडतेचा अपमान असल्याची भाजपची टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांचा नवा पक्ष ‘भारत राष्ट्र समिती’ वादात सापडला आहे. अलीकडे केसीआर यांच्या पक्षाने आपल्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे केले होते. मात्र, आता ‘बीआरएस’वर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे.
तेलंगणातील निजामाबादचे भाजप खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ट्विटरवर ‘टीआरएस’ यांचे होर्डिंग शेअर केले आहे. या होर्डिंगमधून अर्धा काश्मीर गायब आहे. ‘बीआरएस’च्या पोस्टरमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भारताच्या नकाशाच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसत आहेत. केसीआर यांच्या पक्षाने देशाचा नकाशा चुकीचा दाखवून भारताच्या संविधानाचा आणि अखंडतेचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे, केसीआरचा पक्ष पीओके भारताच्या नकाशातून हटवून पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री डॉ. पार्थसारथी यांनीही या मुद्यावर प्रतिक्रिया देत केसीआर हे देशद्रोही असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ातच काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही नकाशासंबंधी अशाचप्रकारची चूक केली होती. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या थरूर यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यात भारताच्या नकाशात अपूर्ण काश्मीर असल्याचे दाखवले होते. यावरून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी चूक सुधारत लगेचच नकाशा बदलला होता.









