70 हून अधिक लोकांची केली होती हत्या
पोर्तुगालाची राजधानी लिस्बनमध्ये आजही एका व्यक्तीचे मुंडक मागील 181 वर्षांपासून जारमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या व्यक्तीने कुठलेच महान काम केले नव्हते. तर हा व्यक्ती कुख्यात सीरियल किलर होता. त्याने अनेक निष्पाप लोकांची निर्दयपणे हत्या केली होती. या सीरियला किलरला पोर्तुगालमध्ये मृत्युदंड देण्यात आला होता. त्याच्यानंतर अन्य कुणालाच या देशात मृत्युदंड देण्यात आलेला नाही
या सीरियल किरचे नाव डियोगो एल्विस असून त्याचा जन्म 1819 मध्ये स्पेनच्या गेसेलिया शहरात झाला होता. तरुणपणी तो कामाच्या शोधात पोर्तुगालच्या लिस्बन शहरात पोहोचला होता. तेथे त्याला नोकरी मिळू शकली नव्हती.
नोकरी न करणाऱया काही लोकांच्या संपर्कात तो आला होता. हे लोक छोटेमोठे गुन्हे करून पैसे मिळत असल्याचे त्याला कळले होते. त्यानेही गुन्हेगारीच्या मार्गावर जात पैसे कमाविण्याचा निर्णय घेतला होता. डियोगोने लुटमारी करत सुरुवात केली होती.
पैशांचा वाढता हव्यास
डियागोच्या मनात आणखी पैसे कमाविण्याचा विचार बळावला. लिस्बनमधील एका पुलाद्वारे त्यावेळी बाहेरील भागात जाता येत होते. त्यावेळी या पूलाचा वापर प्रामुख्याने शेतकरी करायचे. हे लोक बाहेरील भागात फळेभाज्या विकून संध्याकाळी याच पूलावरून घरी परतायचे. यातील काही शेतकरी एकटेच परतत होते. अशाच एकटय़ाने प्रवास करणाऱया शेतकऱयांना लक्ष्य करण्यास त्याने सुरुवात केली. अशा शेतकऱयांना लुटून तो त्यांना पूलावरून खाली ढकलून देत होता. 213 फूट उंचीच्या पुलावरून खाली कोसळल्यावर मृत्यू निश्चित असायचा. हळूहळू लिस्बनबाहेर जाणारे शेतकरी गायब होत असल्याची चर्चा सुरू झाली. पूलाखाली अनेक मृतदेह आढळून आल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले होते. मृतदेहांवर जखमांच्या खुणा नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे मानणे होते. परंतु अधिक चौकशी केल्यावर हा पूल काही काळासाठी बंद करण्यात आला आणि शेतकरी बेपत्ता होण्याचे प्रकारही थांबले. डियागोने यानंतर तीन वर्षापर्यंत काहीच केले. तीन वर्षांनी पूल पुन्हा खुला केल्यावर तेथे बंदोबस्त ठेवण्यात आला.
टोळीची निर्मिती
डियागोने यामुळे गुन्हय़ाची पद्धत बदलत स्वतःची एक टोळी निर्माण केली. या टोळीच्या मदतीने तो श्रीमंत कुटुंबांना लक्ष्य करू लागला. अशा लोकांच्या घरी लूट करत त्यांना ठार करून तो फरार व्हायचा. पोलिसांना शहराबाहेरील गुंड येऊन गुन्हे करत असल्याचा सुगावा लागला होता. पोलिसांनी 4-5 संशयितांना पकडले आणि त्यांनी चौकशीत गुन्हे कबूल केले होते. डियागो हाच टोळीचा म्होरक्या असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने 70 हून अधिक जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली होती.
प्रेनोलॉजी संशोधन
डियागोवरून शहराच्या लोकांमध्ये मोठा संताप होता. फेब्रुवारी 1841 मध्ये त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला. काही डॉक्टर्सनी न्यायालय आणि सरकारकडे मृत्यूनंतर डियोगोचा मेंदू संशोधनासाठी स्वतःजवळ ठेवण्याची अनुमती मागितली होती. सीरियल किलर्सची मानसिकता कशी असते यावर संशोधन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. याला प्रेनोलॉजी म्हटले जाते. संशोधनानंतर डियागोचे मुंडके युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बनमध्ये ठेवण्यात आले आहे.









