ऑनलाईन टीम/तरुण भारत
निवडणूक आयोगाकडून (election commission of india) शनिवारी (दि. ८) शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. यांनतर अनेक राजकीय नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही यावर प्रतिक्रिया देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. २०१४ पासूनच शिवसेना संपवण्याचा प्लॅन शरद पवारांचा होता, असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो स्वागतार्ह असेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळं आपल्या लक्षात येतं की हे मोठे नेते काहीही करू शकतात. २०१४ पासून त्यांचा शिवसेनेला संपवण्याचा प्लॅन होता, असं वक्तव्य विजय शिवतारेंनी केलं आहे. त्यामुळं आता शिवतारेंनी थेट शरद पवारांवर आरोप केल्यानंतर आता शिंदे गट आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात?
पुढे ते म्हणाले, की २०१४ ला पवार यांनी भाजपला बिनर्शत पाठींबा दिला होता. तो त्यांचा कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजप यांचा संसार चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होतेच. मात्र, २०१९ ला एका खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.