सीमावासीयांच्या नेहमीच पाठिशी
बेळगाव / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हय़ातील पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सीमाप्रश्नाची सद्यस्थिती, मराठी माणसावर होणारा अन्याय या विषयीची माहिती करून घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासाठी बैठक बोलावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
संपादक जयवंत मंत्री यांनी तरुण भारतचे सीमाभागातील योगदान तसेच तरुण भारतची वाटचाल या विषयी माहिती दिली. तरुण भारतचा दिवाळी अंक देऊन आमदार लंके यांचे स्वागत करण्यात आले. आमदार लंके यांनी तरुण भारतच्या लढवय्या वृत्तीबद्दल तसेच सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या जिद्दीबद्दल कौतुक केले. किरण ठाकुर यांनी तरुण भारत व लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
कोरोना काळाविषयी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात तब्बल 1 लाख लोकांचे स्कॅनिंग करून सर्वसामान्यांचे 30 कोटी रुपये वाचविले. गोरगरिबांना चांगल्या वैद्यकीय सेवा व शिक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारण किंवा कोणतेही पद हे काही क्षणापुरते असते, माणसाचे कामच त्याची ओळख निर्माण करते. समाज हे आपले कुटुंब असून, त्यांच्या सुख-दुःखात सामील होणे हे आपले काम आहे. सीमाप्रश्न हा केवळ बेळगावचा नाही तर माझाही प्रश्न असून मराठी भाषिकांवरील अन्याय कमी झाल्यावरच येथे येऊन फेटा बांधून घेईन, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्नेहालयचे नरेश पाटील, राहुल झवरे, बंडू रोकले, प्रकाश निवडुंगे, हरिष जायभाजे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सचिन केळवेकर, नागेश बोबाटे, गुंडू कदम, तरुण भारतच्या वरि÷ पत्रकार मनीषा सुभेदार, रमेश हिरेमठ, गंगाधर पाटील, सुशांत कुरंगी, सुनील राजगोळकर यासह इतर उपस्थित होते.
बेळगावमध्ये ट्रक घेऊन आल्याची आठवण
बेळगाव हे ट्रक बॉडीबिल्डिंगसाठी ओळखले जाते. जेव्हा ट्रक घेतला तेव्हा त्या ट्रकची बॉडी बांधून घेण्यासाठी 15 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये आलो होतो. त्यावेळी आठ दिवस येथील जेवणाचा व आल्हाददायक निसर्गाचा अनुभव घेतला आहे. आज 15 वर्षांनी पुन्हा बेळगावमध्ये येण्याची संधी मिळाली असून त्या ट्रकची आठवण पुन्हा एकदा ताजी झाल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.









