लोणावळा / वार्ताहर :
इंग्लंड येथील पंधरा जणांच्या शिष्टमंडळाने ऐतिहासिक कार्ला नगरीला शुक्रवारी भेट दिली. 4 जानेवारी 1779 रोजी कार्ला येथे इंग्रज आणि मराठय़ांची लढाई झाली होती. या लढाईत इंग्रजाचा सर्वात मोठा पराभव झाला होता. या ऐतिहासिक घटनेविषयी इतिहासाचे अभ्यासक नितीन शास्त्री यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली. तसेच पुढील पिढीला देशात इंग्रजांबरोबर झालेल्या सर्वात मोठय़ा लढाईचा व या लढाईत मराठय़ांचा सर्वात मोठा विजय झाला असल्याने तो कायम स्मरणात राहावा, या करीता या ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभाविषयी माहिती सांगितली.
तथाकथित इंग्रज सेनापती स्टुअर्ट फाकड्डा या लढाईत मारला गेला होता, अशी इतिहासात नोंद आहे. कार्ला येथील ऐतिहासिक तळय़ाकाठी स्टुअर्ट फाकड्डांचा स्तंभ आहे. या सर्व ऐतिहासिक घटनेची इंग्लंडच्या दप्तरी नोंद असून, त्याची साक्ष या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट दिल्याने पाहण्यास मिळाली. या शिष्टमंडळात इंग्रज सेनादलाचे माजी कर्नल पॅट्रीक्स हे देखील आले होते. कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करत लढाई बाबतची माहिती दिली तसेच दरवषी याठिकाणी विजयदिन साजरा केला जातो, याची माहिती दिली.
अधिक वाचा : आता प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन : डॉ. सुरेश खाडे