कुपवाडमध्ये टोळक्याचे कृत्य; सहाजणांच्या मुसक्या आवळल्या; कारसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबी व कुपवाड पोलिसांची कारवाई
कुपवाड प्रतिनिधी
कमी वेळेत ज्यादा पैसे मिळतील, या हव्यासापोटी सागरने लोकांकडून पैसे गोळा करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रणवचा भाऊ पंकजला तब्बल एक कोटी रुपये दिले. या बदल्यात पंकजने बरेच महिने मुद्दल आणि परतावाही दिला नाही, म्हणून कुपवाडमधील सहाजणांच्या टोळक्याने रक्कम वसुलीसाठी प्लॅन करून प्रणवचे अपहरण करून ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामध्ये कुपवाडमधील प्रणव नामदेव पाटील (23, रा. लाड शाळेमागे) या तरुणाचे ‘त्या’ सहाजणांनी मिळून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याचे उघडकीस आले. याबाबत प्रणवच्या पत्नीने कुपवाड पोलिसात धाव घेऊन पतीच्या अपहरणाबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रणवच्या शोधासाठी पथके रवाना केली आणि अखेर सहाजणांच्या टोळीला पकड़ून मुसक्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांना शुक्रवारी यश आले.
यामध्ये संशयित राजू रावसाहेब काळे (28, रा. शरदनगर, कुपवाड), सागर सुखदेव कोळेकर (33), संदेश रामचंद्र घागरे (19), कल्पेश दिनकर हजारे (21, तिघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड),किरण शंकर लोखंडे (23),सोन्या ऊर्फ बापू हरी येडगे (27, दोघेही रा. बामणोली, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील गुह्यात वापरलेली एक स्वीफ्ट कार, हत्यारे व मोबाईल असा 4 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या सहाजणांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता 11 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला आहे.
यामधील संशयित सागर कोळेकरने मागील काही महिन्यात शहरातील काही लोकांकडून पैसे घेऊन आपला चांगला फायदा होईल, या हव्यासापोटी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रणव पाटीलचा भाऊ पंकज पाटील यांच्याकडे एक कोटी रुपये दिले होते. परंतु, पंकज पाटील आमचे पैसे परत करत नव्हता, शिवाय त्याचा झालेला फायदाही सांगत नव्हता. त्यामुळे ते पैसे वसूल करण्यासाठी आम्ही पंकजचा भाऊ प्रणवचे अपहरण करून त्यास ओलीस ठेवून पंकज पाटील याच्याकडून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली सागरने पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव पाटील कुपवाडमधील लाड शाळेजवळ कुटुंबासोबत राहतात. बुधवारी रात्री अनोळखी दोघेजण पाटील यांच्या घरासमोर आले. त्यांनी एकाचा पत्ता विचारला. यावेळी पाटील यांनी या नावाची कोणी व्यक्ती इथे रहात नसल्याचे सांगितले. यावेळी समोरून लाड शाळेकडून नंबर नसलेली एक निळी कार आली आणि पाटील यांच्या घरासमोर थांबली. यावेळी पत्ता विचारत असलेले दोघे व ‘त्या’ कारमधून आलेले चौघे अशा सहाजणांनी मिळून गाडीतून खाली उतरून प्रणव पाटील यांना अज्ञात कारणावरून कारमध्ये जबरदस्तीने घालून अपहरण केले. याबाबतची तक्रार प्रणवच्या पत्नीने कुपवाड पोलिसात दिल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, मिरजेचे उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी सतीश शिंदे व कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. दोन्ही संयुक्त पथकाने अपहरण ठिकाणची माहिती घेऊन तपास सुरू केला. यावेळी संशयित राजू काळे व त्याचे पाच साथीदार मिळून प्रणव पाटील यांना कारमध्ये घालून विटा येथून तासगाव मार्गे कोठेतरी घेऊन जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या दोन्ही पथकाने विटा – तासगाव रस्त्यावर बायपास रस्त्यालगतच्या एका मंगल कार्यालयासमोर नाकाबंदी केली. यावेळी वाहनांची तपासणी करीत असताना भरधाव वेगाने येणाऱया कार चालकाने गाडी न थांबवता तशीच सुसाट पुढे नेली. पोलिसांनी कारचा पाठलाग करून कार अडवली. संशयावरुन कारमधील व्यक्तींची नावे विचारली असता राजू काळे, सागर कोळेकर, किरण लोखंडे, सोन्या ऊर्फ बापू येडगे, संदेश घागरे, कल्पेश हजारे अशी त्यांनी नावे सांगितली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 1 लाख 11 हजार रुपयांचे 6 मोबाईल तसेच कारच्या पाठीमागील डिक्कीत ठेवलेले दोन लाकडी दांडके, धारदार कोयता, सुरा अशी हत्यारे मिळून आली. तसेच विना नंबरची कार 3 लाख 50 हजार मिळून 4 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.