Search operation in the sea by the police for the youth who drowned in Shiroda-Velagar
शिरोडा वेळागर येथील समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या राजस्थान मधील त्या युवकाचा शोध समुद्रात नौकेव्दारे घेण्याची मोहीम प्रथमच वेंगुर्ले पोलीसांनी राबविली. शिरोडा वेळागर येथील समुद्रात दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राजस्थान (जिल्हा-सिकर, तालुका श्रीमाधोपूर- सिकाना) येथील लादी, फरशी, प्लंबिंगचे काम करणारा कामगार दीनदयाळ सत्यनारायण राव (20) हा आंघोळ करून पर्यटनाचा आनंद लुटत असताना पाण्यात पडून बेपत्ता झाला. तब्बल दोन दिवस होऊनही तो सापडलेला नाही.
वेंगुर्ले पोलिसांनी सदर युवक शोधण्यासाठी शिरोडा-वेळागर येथील राज स्पोर्टच्या सहकार्याने वापरण्यात येणाऱ्या जलक्रीडा नौकेचा वापर करुन स्वतः जातीनिशी पोलीसांनी स्थानिक मच्छिमार, बेपत्ता युवकाचे नातेवाईक सोबत घेऊन समुद्रात शोध मोहीम राबविली. हि शोध मोहिम वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली या शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी, पोलीस नाईक योगेश राऊळ, काॅस्टेबल सुरज रेडकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. आज तिसऱ्या दिवशी शुक्रवारी शोध मोहीम राबवली मात्र तरी तो सापडून आलेला नाही.
सध्या समुद्र अंतर्गत असलेले प्रवाह व वाऱ्यांची बदलती दिशा यामुळे बेपत्ता युवकाचा मृतदेह खोल समुद्रात किंवा समुद्रकिनारी वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांनी तसेच समुद्रकिनारी वावरणाऱ्या मच्छीमारांनी सागर सुरक्षारक्षकांनी अशा वर्णनाचा मृतदेह आढळल्यास तात्काळ वेंगुर्ले पोलीस स्टेशन फोन नं. 02366-263433 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी. असे आवाहन या प्रकरणाचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी यांनी केले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-