कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचा नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे पालखी सोहळा ,ललिता पंचमी, अष्टमीची नगरप्रदक्षिणा, तसेच विजयादशमीचा दसरा चौकातील सोहळा होय.शेकडो वर्षांची ही भक्तीची अविरत परंपरा याचा मार्गही वर्षानुवर्षे ठरलेलाच असतो. हळूहळू या सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरूप आले. लाखो भक्तांची व्यवस्था आपोआपच प्रशासनाकडे येते. यात काही किरकोळ त्रुटी या राहणारच. या देवीच्या पालखीसोबत श्री तुळजाभवानी देवी, राजगुरू श्री सिद्धेश्वर बुवा महाराज, तसेच पंचगंगा घाटावर भेटीस येणारी श्री रंकभैरव देवाची पालखी देखील असते. तसेच या ठिकाणी स्वतः करवीरचे छत्रपती आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित असतात .
परंतु, सहज दर्शनी येणारी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ललिता पंचमी दिवशी ज्या पारंपारिक मार्गाने या सर्व पालख्या जातात हा मार्ग आदले दिवशीच खडीकरण व डांबरीकरण केलेला होता. त्यामुळे हजारो भक्तांना, पालखीसोबतचा लवाजमा पालखीचे सेवेकरी या सर्व अनवाणी भक्तांना उन्हामुळे ताजे गरम वितळलेले डांबर व खडी या खडतर मार्गावरूनच पुढे जावे लागले. आजही विजयादशमी दिवशी दसरा चौकातून सोहळा संपन्न झाल्यावर या सर्व पालख्या पंचगंगा नदी घाटावर करवीर छत्रपतींच्या समाधी स्थळावर सर्व लावाजण्यास विसाव्यासाठी भेटीस येतात. तरीदेखील आज दुपारपर्यंत येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण चालू होते .एकीकडे शाही दसरा सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरूप देऊन देशभरातून पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे प्राथमिक व्यवस्था या थोड्या लवकर पूर्ण होणे अपेक्षित होते. या सर्व पालखीसोबत लहान मुले, स्त्रिया, इतकेच काय ज्येष्ठ नागरिकही अनवाणी सोबत असतात. या सर्व प्रकारामुळे देवीभक्त व स्थानिक नागरिक यांच्याकडून नाराजीचा सूर येत आहे.