डांबरीकरणाने खड्डे बुजवावेत अन्यथा आंदोलन
वाकरे / प्रतिनिधी
फुलेवाडी ते गगनबावडा या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून त्वरित भरावेत अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली २० गावच्या सरपंच,उपसरपंचांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग ७ चे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
फुलेवाडी ते गगनबावडा रस्ता खड्डेमय झाला असून अनेक जणांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत.या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवासात करावा लागत आहे. या रस्त्यावरून कोकणात गोवा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.तसेच कुंभी, राजाराम, डी.वाय.पाटील, दालमिया इत्यादी कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. तसेच कोपार्डे जनावरांचा बाजार,कळे, सांगरूळ येथे ग्रामीण भागातील मोठ्या व्यापारपेठा आहेत. रोजगारासाठी शहराकडे जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे.हा रस्ता अरुंद असून रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने तरुण मुलांना जीव गमवावे लागत आहेत. महामार्ग विभागाने तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे तसेच बालिंगे येथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे तो बास्केट ब्रिज व्हावा अन्यथा या पुराचा धोका बालिंगे, नागदेववाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, साबळेवाडी कोगे इत्यादी गावांना होणार आहे, गावात पाणी शिरून घरांचे,शेतीचे नुकसान होणार आहे. या रस्त्याचे येत्या १५ दिवसात डांबरीकरण करून खड्डे बुजवावे अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता २० गावांचे सरपंच व ग्रामस्थ बालिंगे येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या निवेदना निवेदनावर मधुकर जांभळे, सरपंच प्रकाश रोटे, राजेंद्र दिवसे, संग्राम भापकर, साताप्पा जाधव, मयूर जांभळे,शिवाजी देसाई, युवराज कांबळे, शिवाजी कांबळे, भगवान भोसले, बाजीराव दिवसे यांच्यासह अन्य सरपंचांच्या सह्या आहेत.









