पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाची मागणी
सातारा / प्रतिनिधी
मराठा समाजाला इतर मागासवर्ग यादीतील क्र. 83 वर तत्सम जात म्हणून समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देण्यात आले. मंत्री देसाई यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासित केले.
निवेदन देताना राजेंद्र निकम, विवेक कुऱहाडे पाटील, विवेकानंद बाबर, अनिल घराळ, मोहन कदम, सुनील शेलार आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा समाज गेली 75 वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे. सामाजिक शैक्षणिक दृष्टय़ा मागास झाल्याने मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संदर्भ देवून सिद्ध केले होते. मराठा कुणबी ही तत्सम जात आहे. यादीत 83 क्रमांकावर समाविष्ट आहे. तर 1 जून 2004 च्या शासन निर्णयान्वये कुणबी मराठा व मराठा या कुणबी जातीच्या पोटजाती घोषित करुन ओबीसी यादी क्र. 83 वर समावेश केला आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजाचा कुणबीची तत्सम जात म्हणून ओबीसी यादी क्रमांक 83 वर समावेश करुन मराठा समाजाला ओबीसी दाखले देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.