राजेश क्षीरसागर यांची माहिती : तयारी पूर्ण : पालकमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज रविवारी (2 ऑक्टोबर) संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात ‘हिंदूगर्वगर्जना’ संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषडदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हे ही वाचा : शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
संपर्क मेळाव्याची जय्यत तयारी
दरम्यान, या संपर्क मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून नियोजनासंदर्भात शनिवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची हिंदूगर्वगर्जना संपर्क यात्रा व मेळावे राज्यभर सुरू केले आहेत. कोल्हापूर जिह्यातील हा पहिलाच मेळावा आहे. तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहा, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.









