पुसेगाव पोलिसांत तक्रार दाखल
पुसेगाव : दरजाई ता. खटाव येथील माजी सैनिकाच्या बंद घराच्या कपांऊड गेटचे तसेच घरातील दरवाजांचे व बेडरुम मधील लोखंडी व लाकडी कपाटाचे कुलुपे तोडून ११ तोळे ९५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ५.५ भार वजनाचे चांदिचे दागिने असे एकूण ४ लाख ८१ हजार ३०० रुपयांची चोरी झाली आहे. या संबंधीची माहिती पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमराव राजाराम यादव हे आपल्या पत्नी सुदर्शनासह येथे राहतात. दिनांक ११ सप्टेंबर रोजी घरातील सर्व दरवाजे बंद करुन पत्नीस गुडग्याचा त्रास असल्याने पुणे येथे कंमाड हॉस्पीटल, येथे अॅडमीट करण्यास यादव गेले होते. जाताना घरा शेजारी राहणारा नारायण बाळू यादव यास पुण्यातून येईपर्यंत बंद घराच्या मागील पडवीत झोपण्यास सांगितले होते. दि २८ रोजी पुणे येथे असताना घरा जवळच्या श्रीकांत शंकर जगदाळे याने सकाळी ७ च्या सुमारास फोन वरुन, तुमच्या घराचे कंपाउंड गेटचे कुलुप तोडलेले आहे. घराचा पुढील दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे सांगितले. म्हणून यादव यांनी घराशेजारी राहणारे रमेश शामराव यादव, अधिक मुगुटराव यादव, रामदास आबाजी बोटे ( पोलीस पाटील ), सुरज पोपट यादव सर्व रा. दरजाई यांना सदरचीबाब सांगितली. सर्वांनी घरात जावून पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले. झोपण्यास येणाऱ्या नारायण बाळू यादव यास रात्री तुम्ही बंगल्यावर झोपण्यास आला होता का असे विचारले असता त्याने माझी तब्बेत बरी नसल्याने दि २७ रोजी घरीच झोपल्याचे सांगितले. सदर चोरीत अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाख ८१ हजार ३०० रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिन्यांची चोरी केली. दरम्यान, त्याच रात्री गावातील आणखी काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पोलीस हवालदार सुधाकर भोसले अधिक तपास करत आहेत.