माजी खास.राजू शेट्टी करणार मार्गदर्शन
पेठ वडगाव / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर एफ आर पी चा संघर्ष उस दराचा या यात्रेची सभा आज दि.२९ सप्टेबर रोजी हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे होणार आहे. या सभेत माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार असून एफआरपी तुकडे करण्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार आहे. या जागर यात्रेस शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केले.
घुणकी येथे दि.२९ रोजी सायंकाळी सहा वाजता घेण्यात येणार असलेल्या जागर यात्रेच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. या जागर यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार असून यावेळी स्वभिमानीचे प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जनार्दन पाटील, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारने व राज्य सरकारने उसाच्या एफ आर पी चे तुकडे करण्याचा घाट घातला आहे तो उधळून लावणेसाठी पुढील आंदोलनाची दिशा या जागर यात्रेत ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैभव कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी सुधीर मगदूम, कृष्णात मोहिते, अण्णा मगदूम,जयसिंग कुरणे,रघुनाथ सिद, दिपक सनदे, मनोहर देसाई, पांडुरंग पाटील, मुरलीधर मोरे, बबन घोडके, महेश मुठे, उत्तम निकम,रमेश सिद, रमेश तेली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.