मागाठाणे बोरीवली येथील शिष्टमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा
मुंबई : मुंबई सह राज्यातील गृहनिर्माण प्रकल्प आणि पुनर्विकास या संदर्भात एक सर्वंकष धोरण तयार करणे आवश्यक आहे. या संदर्भात येत्या आठड्याभरात स्वयं पुनर्विकासाचे धोरण लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सुस्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे गृहनिर्माण खाते असल्याने मागाठाणे, बोरिवली (पूर्व) येथील जय महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण निवासी महासंघ म. च्या पदाधिकाऱ्यांचे ५ जणांचे शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून स्वयं पुनर्विकास धोरणाची अंमलबजावणी करण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले. त्यात महासंघातर्फे अध्यक्ष श्री. नरेंद्र गावडे , सचिव श्री. प्रशांत जाधव , खजिनदार श्री. चेतन जगताप , ज्येष्ठ कमिटी सदस्य श्री विजय केळुसकर तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि सभासद श्री. विजय वैद्य उपस्थित होते. २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असतांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी स्वयं पुनर्विकासाचे धोरण आखण्यात आले होते आणि त्यानुसार तसा शासन निर्णय ही काढण्यात आला होता. याची त्यांना खास आठवण करून देण्यात आली.
त्याच धोरणाच्या अनुषंगाने उपरोक्त महासंघाच्या अधिपत्याखाली आठ संस्थांच्या इमारतींचा (६४० सभासदांच्या सदनिकांचा) सामूहिक स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव म्हाडाच्या स्वयं पुनर्विकास कक्षामध्ये मंजुरीसाठी ऑक्टो २०१९ मध्ये दाखल केला आहे. परंतु सरकार तर्फे आजतागायत या धोरणाची अंमलबजावणी झाली नसल्याने या धोरणा अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून सभासद वंचित आहेत आणि स्वयं पुनर्विकासाला अजूनही गती मिळालेली नाही.
या प्रकल्पाप्रमाणे इतरही बरेच प्रकल्प याच धोरणाची अंमलबजावणी न झाल्यामुळे बाधित झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर उप मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करून येत्या आठड्याभरात स्वयं पुनर्विकासाचे धोरण लागू करण्याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.