प्रज्ञा मणेरीकर /पणजी
महिलांनी समाजात मिळत असलेल्या दुय्यम मानसिकतेतून मुक्त होऊन स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करावे. समानता हा जीवन समृद्धीचा मानबिंदू आहे. आपल्या हक्कांप्रती उदासिन राहू नका. महिलांनी आत्मनिर्भर बनून कुटुंबाला सबल करावे आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करावे असे मत ज्येष्ठ समाजसेविका कृष्णी वाळके यांनी तरूण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
कृष्णी वाळके एक कर्तृत्त्ववान महिला असून अनेक प्रकारच्या अडीअडचणींवर मात करून, संघर्षाशी सामना करून त्या घडल्या आहेत. त्यांच्या बोलण्याच्या ओघवत्या शैलीमुळे अनेकजणांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मडगाव म्हणजेच मठग्राम ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीदेखील. परंतु मडगावपुरते त्यांचे कार्यक्षेत्र न राहता संपूर्ण गोव्यात पसरलेले आहे. त्यांच्या धडाडी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचे नावलौकिक संपूर्ण गोमंतकात तसेच गोव्याबाहेरही झाले आहे.
पॉप्युलर इंग्लिश हायस्कूलपासून शैक्षणिक कारकीर्द सुरू
मडगाव नगरीत वास्तव्य करीत असलेल्या अंता रायकर यांच्या प्रतिष्ठित घरात आणि 40-46 माणसांच्या एकत्र कुटुंबात माझा जन्म झाला. मडगाव येथील महिला आणि नूतन मराठी विद्यालयात कृष्णी वाळके यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर मराठी भाषेतूनच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मी आमच्या कुटुंबातील मुलांमध्येही पहिलीच अकरावी म्हणजे मॅट्रीक उत्तीर्ण होणारी मुलगी होती. त्या काळी मॅट्रीकपर्यंत शिक्षण झाले की मुलींची शैक्षणिक कारकीर्द संपून जायची. याच विचारधारणेमुळे माझ्याही शिक्षणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु मी जिद्दीने माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. मे 1964 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सकारात्मक सहभाग नोंदविल्यानंतर पहिल्या आठवडय़ात माझ्या बी ए परीक्षेचा निकाल आला. मी त्यात प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आणि पदवी घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर लगेचच मडगावच्या पॉप्युलर इंग्लिश हायस्कूलचे संस्थापक सदानंद नायक यांनी हायस्कूलमध्ये हिंदी शिक्षिकेच्या नोकरीचा प्रस्ताव समोर ठेवला आणि तेव्हापासून माझ्या शैक्षणिक कार्याची कारकीर्द सुरू झाली असे कृष्णी वाळके यांनी सांगितले.
मडगाव महिला मंडळाद्वारे समाजकार्यासाठी मिळाली प्रेरणा
1964 ते 1968 सालापर्यंत पॉप्युलर हायस्कूलमध्ये हिंदी शिक्षिका म्हणून कार्य केले. त्यानंतर अनेक जबाबदाऱया या दरम्यान पार पाडल्या. मडगाव महिला मंडळ हे गोव्यातील एक आदर्श महिला मंडळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच 1964 साली पॉप्युलर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रूजू झाल्यावर लगेच मी मडगाव महिला मंडळाची सदस्य बनले. दुसऱयाच दिवशी 1965साली महिला मंडळाची निवडणूक झाली आणि यात माझी सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. या दरम्यान तीन वर्षे खूप कार्ये करण्याची संधी मिळाली आणि मडगावच्या प्रमुख लोकांशी संपर्क वाढत गेला. महिला मंडळाची सेक्रेटरी असतानाच 1968 साली माझा विवाह झाला आणि समाजकार्याला विराम मिळाला. समाजकार्यातील माझं पहिले प्रेरणास्थान मडगाव महिला मंडळाला मानते असे कृष्णी वाळके सांगतात. पॉप्युलर हायस्कूलमध्ये हिंदी विषयाचे अध्यापनकार्य करत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु त्याला न जुमानता शाळेत नवनवीन उपक्रमशीलता प्रकट केली. विद्यार्थ्यांना सातत्याने पारितोषिके प्राप्त करून दिल्या.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याबरोबरीने मला 1964सालापासून राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी माझ्या वडिलांमुळे मिळाली. 1965मध्ये झालेल्या भारत पाक युद्धाच्यावेळी राष्ट्रीय संरक्षण निधीस मदतीसाठी आवाहन केले. महिला मंडळाने मडगाव मार्केटमध्ये फिरून मदतीसाठी भरपूर वस्तू गोळा केल्या. 16 जानेवारी 1967ला जनमत कौलवेळी माझ्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी मगो पक्षाच्या प्रचारासाठी कार्य केले. मगो पक्ष मजबूत करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. मगो पक्षानंतर 1998पासून ते आजपर्यंत मडगाव महिला अध्यक्ष म्हणून कार्यास सुरूवात केली. 2000 ते 2004पर्यंत गोवा राज्य महिला मोर्चा सेक्रेटरी, 2004 ते 2009पर्यंत राष्ट्रीय महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्या, त्यानंतर दक्षिण गोवा महिला मोर्चा आणि आता गोवा राज्य कार्यकारिणी सदस्य असून भाजपची सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. शिवाय मडगाव भाजपची सल्लागार समितीवर ज्येष्ठ कार्यकर्ती म्हणून कार्यरत असल्याची माहिती कृष्णी वाळके यांनी दिली. 1978 ते 1985 अशी सात वर्षे मी वास्कोला घालविली. या दरम्यान वनिता मंडळाला विविध कार्यात समाविष्ट करून कार्यरत केले.
मडगावजवळच्या दवर्ली या खेडेगावात पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. तसेच गोवा मार्केटिंग फेडरेशनचे मडगाव सहकार भांडार सुरू केले. सहकारक्षेत्रातील विविध प्रकारच्या कार्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक गौरवांचे क्षण आले. दैवज्ञ समाजातील ज्ञाती बांधवांचे लेखन सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी गोमंत कालिका हे मुखपत्र सुरू करण्यात आले. पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आल्यामुळे त्यांनी सराफी व्यवसायाला प्रारंभ केला. गोव्यात महिला सशक्तीकरणासाठी विविध समित्यांची निवड केली. महिला मेळावे, जागृती कार्यक्रम आयोजित केले.
विवाहापूर्वी मी मडगावमध्ये हिंदी अध्यापिका होते आणि राष्ट्रभाषा समिती वर्धा या संस्थेसाठी कार्यरत होते. 2016साली गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाची अध्यक्ष म्हणून एप्रिल महिन्यात माझी निवड करण्यात आली. गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ हे त्यावेळेच्या मडगावात हिंदी प्रचारासाठी वावरणाऱया सभा पुणे आणि राष्ट्रभाषा समिती वर्धा या दोन्ही संस्थांचे एकीकरण करून ठेवलेले नाव. विद्यापीठाचे वर्षभर होणारे कार्यक्रम न चुकता संपन्न केले जातात. वर्षभर विविध कार्यक्रम करून गोव्यात हिंदी प्रचार करणे हे या विद्यापीठाचे उद्दीष्ट आहे. प्रामुख्याने हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हिंदी आपली राष्ट्रभाषा असून ती शिकून तिच्याविषयी अभिमान ठेवण्याबद्दल आवाहन करतो. परंतु अजूनही हिंदी भाषा वाचन करणारे विद्यार्थी कमीच दिसून येतात. मडगावमध्ये हे विद्यापीठ कार्य करत असले तरी पूर्ण गोव्यातील विद्यार्थी या विद्यापीठाचा लाभ घेतात असे कृष्णी वाळके यांनी सांगितले.
मडगावी इंटरनॅशनल मानव हक्क असोसिएशनची स्थापना करून गरीब महिलांचे प्रश्न, समस्या संघटनेमार्फत सोडविला. याशिवाय लोक आंदोलन, मडगाव टुगेदर, बायलांचो एकवट, गोमंत विद्यानिकेतन यासारख्या अनेक सामाजिक संघटनेमार्फत समस्या, महिलांचे हक्क, महिलांवरील होणारे अत्याचार अन्याय वाचा फोडण्यासाठी कार्य केले आहे. आतापर्यंत कृष्णीताईंना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय अगणित सन्मानही झाले आहेत. विशेष म्हणजे गोव्यात इतके सारे सन्मान होणाऱया कृष्णी वाळके या एकमेव महिला आहेत. गोवा सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिष्ठेचे यशोदामिनी व महिला सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात त्यांना गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ मडगावच्या अध्यक्ष म्हणून गोवा सरकारतर्फे सत्कार करण्यात आला आहे.
एक समाजसेविका, राजकारणातील प्रमुख कार्यकर्ती, सहकार क्षेत्रात सहभाग देणारी आणि महिला सशक्तीकरणासाठी झटणारी एक महिला म्हणून आजही प्रत्येक गोमंतकीयांच्या मनात एक वेगळी ओळख कृष्णी वाळके यांनी निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रावर स्वकर्तृत्त्वाने प्रभुत्व मिळविले.









