ऑनलाईन टीम/भारत
Rajasthan Political Crisis : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्धार केला. त्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून मोठा राजकीय पेच निर्माण झाला. काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या नावाला गेहलोत समर्थक आमदारांनी विरोध दर्शवला आहे. तर, काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. यासर्व प्रकारांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (soniya Gandhi) यांनी काँग्रेसचे प्रभारी अजय माकन (Ajay Maken) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना मध्यस्थीसाठी पाठवले होते. मात्र, आता गेहलोत यांच्याजवळील समजले जाणारे काँग्रेसचे आमदार शांती धारीवाल (shanti dhariwal) यांनी अजय माकन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राजस्थानच्या कॅबिनेट मंत्री शांती धारीवाल यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा १०० टक्के कट होता आणि अजय माकन त्या कटाचा एक भाग असल्याचा दावा मंत्री शांती धारीवाल यांनी केला.
हे ही वाचा : राज्यस्थानमध्ये राजकीय संकट; सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध
धारीवाल म्हणाले की, ‘माकन यांच्या या कारस्थानामुळे आमदार नाराज झालेत. त्यांचा मला फोन आला की माझे ऐका. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी मी त्यांना माझ्या घरी बोलावले. गद्दारांना बक्षीस देणे येथील आमदारांना मान्य नाही. मला राजकारणात ५० वर्षे झाली. एकदाही शिस्तभंग केला नाही. मी सोनिया गांधींचा सैनिक आहे.’
पुढे बोलताना, शांती धारीवाल यांनी सचिन पायलट यांच्यावर पडदा टाकला जात असेल आणि गद्दारांना बक्षीस दिले जात असेल तर राजस्थानचे आमदार सहन करणार नाहीत. मुख्यमंत्री (अशोक गेहलोत) यांना हटवण्याचा हा १०० टक्के कट होता आणि प्रभारी सरचिटणीस त्याचा एक भाग होते. मी इतर कोणाबद्दल बोलत नाही, खरगे यांच्यावर कोणताही आरोप नाही, मी प्रभारी सरचिटणीस बोलतोय. ते पुढे म्हणाले की, राजस्थानच्या असंतुष्ट आमदारांनी त्यांना त्यांचा आवाज ऐकण्यास सांगितले आहे.