वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जॉर्डनमध्ये झालेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय अश्वदौड टेंट पेगिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱया भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार ऋतिका दाहिया, प्रियांका भारद्वाज आणि खुशी सिंग यांनी समाधानकारक कामगिरी करत कांस्यपदक मिळविले.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 14 देशांच्या स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत आपले पदार्पण केले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने 170.5 गुणांसह सुवर्णपदक, ओमानने 146 गुणांसह रौप्यपदक तर भारताने 136 गुणांसह कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या दाहिया आणि भारद्वाज यांनी वैयक्तिक आणि पेयर्स लान्स प्रकारात आपला सहभाग दर्शविला होता. भारताने पहिल्या दिवशी सातवे स्थान मिळविले होते. स्पर्धेच्या दुसऱया दिवशी भारतीय संघाने वैयक्तिक आणि सांघिक स्वॉर्ड प्रकारात आपला सहभाग दर्शविताना 24 गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते. वैयक्तिक गटात खुशी सिंगने 18 गुणांसह पहिले स्थान घेतले होते. या कामगिरीमुळे भारताने स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली होती. स्पर्धेच्या तिसऱया दिवशी भारतीय स्पर्धकांनी रिंग, पेग आणि स्वॉर्ड या प्रकारात आपला सहभाग दर्शवून दुसरे स्थान मिळविले आणि एकंदर कामगिरीत त्यांनी तिसरे घेत कांस्य मिळविले.









