चेन्नई / वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनी ऍपलच्या ‘आयफोन-14’ चे उत्पादन चेन्नई नजीकच्या फॉक्सकॉनच्या उत्पादन केंद्रात सुरु झाले आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या कंपनीचे हे स्मार्टफोन्स भारतात अतिशय महाग मिळतात, कारण त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात कर आकारणी केली जाते. तथापि, आता भारतातच त्यांचे उत्पादन सुरु झाल्याने ते स्वस्त होणे शक्य आहे.
भारतात या अत्याधुनिक स्मार्टफोन्सचे उत्पादन सुरु करताना कंपनीला अतिशय आनंद आणि उत्साह वाटत आहे. या कंपनीने या मोबाईल्स उत्पादन भारतात प्रधम बेंगळूर येथे 2017 मध्येच सुरु केले होते. त्यानंतर आयफोन 65 चे उत्पादन हाती घेण्यात आले. आता चेन्नई नजीकच्या श्रीपेराम्बुदूर येथे आयफोन 14 चे उत्पादन हाती घेण्यात आले आहे. त्याआधी भारतात आयफोन 11, आयफोन 12 आणि आयफोन 13 चे उत्पादन सुरु करण्यात आले होते. आयफोन 14 हे विशेष करुन भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादित करण्यात येत आहेत.
अतिशय आधुनिक
कंपनीने नव्या फोन्सच्या मार्केटिंगसाठी नवे धोरण अवलंबले आहे. या फोन्सच्या वेष्टणावर ‘मेड इन इंडिया’ असे नमूद केले जाणार आहे. आयफोन 14 हा आयफोन 12 आणि आयफोन 13 यांच्यापेक्षा अधिक आधुनिक असून त्यांच्यात फिचर्स जास्त आहेत. त्यांचा टिकावूपणाही पूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा जास्त आहे.
चीनमधून हलविणार
जागतिक राजकीय स्थिती तणावग्रस्त बनल्याने ऍपल कंपनी चीनमधून आयफोनच्या उत्पादनाचा काही भाग इतर देशांमध्ये हलविणार आहे. यात भारताला प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाय चीनमध्ये अद्यापही कोरोनाचे संकट असून अनेक शहरांमध्ये कठोर लॉकडाऊन निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मोठय़ा कंपन्या चीन सोडून बाहेर जात असून भारतात येण्यास उत्सुक आहेत, असे दिसून येते. चीननंतर भारतच हाच स्मार्टफोन्स उत्पादनातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. सध्या ऍपलचे बहुतेक उत्पादन चीनमध्ये होते. केवळ पाच टक्के उत्पादन इतर देशांमध्ये घेतले जाते. या उत्पादनांमध्ये मॅक, आयपॅड, ऍपल वॉच आणि एअरपॉडस् यांचा समावेश आहे. 2015 पर्यंत चीनमधून 25 टक्के उत्पादन बाहेर काढण्याची कंपनीची योजना असून यापैकी मोठा वाटा भारताला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.









