12 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक ः सप्टेंबरमध्ये व्यवहार होणार पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील दिग्गज उद्योग क्षेत्रातील कंपनी रिलायन्स समूहाची कंपनी रिलायन्स न्यू एनर्जीने अमेरिकेतील सोलार तंत्रज्ञान फर्म केलक्स कॉर्पोरेशनमध्ये 20 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. हा व्यवहार 12 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीतून रिलायन्सने पूर्ण केल्याची माहिती आहे.
केलक्सला होणार फायदा
अमेरिकेतील पसदेना येथील केलक्स ही फर्म सोलर तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करते. उच्च दर्जाचे सोलर मॉडय़ुल कंपनी तयार करते. रिलायन्सने यातील 20 टक्के वाटा खरेदी केला असून तसा उभयतात करारही करण्यात आला आहे. या गुंतवणुकीचा फायदा केलक्सला आपल्या उत्पादन वाढीसाठी व एकंदर व्यवसाय विकासासाठी होणार आहे.
धोरणात्मक भागीदारीसाठी दोन्ही कंपन्या एकत्र काम करणार असून तांत्रिक सहकार्याची देवाणघेवाण आगामी काळात केली जाणार आहे. सदरचा भागीदारीच्या व्यवहाराला कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नसणार असून हा व्यवहार सप्टेंबर अखेर पूर्ण होईल, अशी आशा
आहे.
जामनगरच्या प्लांटमध्ये बनवणार सोलर मॉडय़ूल्स
रिलायन्स आगामी काळात जामनगर, गुजरात येथे फोटोव्होल्टीक गिगा फॅक्टरी स्थापन करत आहे. अमेरिकेतील फर्म केलक्ससोबतच्या भागीदारीतून रिलायन्स आगामी काळात कमी खर्चात अधिक उर्जावान सोलर मॉडय़ूल्स तयार करणार आहे, अशीही माहिती आहे.









