यादवनगर येथील घटना, 10 जनांनावर गुन्हा दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी
यादवनगर येथील महावितरण कार्यालय नजीक दगडाने ठेचून सराईत गुंडांचा खून करण्यात आला. रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चिन्या उर्फ संदीप अजित हळदकर ( वय 30 ) असे त्याचे नाव आहे. अभिषेक म्हेतर, महेश नलवडे, रोहन पाटील, शुभम कदम, अजय कवडे, दादू पवार, सुधीर मोरे यांच्यासह अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सराईत गुंड चिन्या हळदकर हा 8 दिवसांपूर्वीच कारागृहतून बाहेर आला आहे. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चिन्या हळदकर आणि संशयित यांच्यात दौलतनगर परिसरात वादावादी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळाला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला महावितरण कार्यालयाजवळ गाठले. दरम्यान चौघांनी मिळून त्याला मारल्याने तो रस्त्यातच पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला. या घटनेची माहिती वऱ्यासारखी यादवनागर परिसरात पसरली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.
हे ही वाचा : सीबीआय पोहचली कागलमध्ये, अन् केली चौकशी
महिलेच्या गळ्याला तलवार
खुनाच्या पूर्वी चिन्या हळदकरने परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दौलतानगर येथील प्राची दीपक कदम यांच्या घरावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा गळ्याला तलवार लावून घर पेटवून देण्याची धमकी दिली. यानंतर त्याने अजीज उल्ला खान यांच्या मालकीच्या रिक्षाची तोडफोड केली. तर महेश नलावडे यांच्या घरावरही दगडफेक केली.