बेळगाव / प्रतिनिधी
दसरा सणासाठी गावी परतणार्या प्रवाशांसाठी नैऋत्य रेल्वेने उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. यशवंतपूर-बेळगाव-यशवंतपूर अशी फेरी असणार आहे. यामुळे दसरा कालावधीत रेल्वेला होणारी गर्दी टाळता येणार असून, प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
यशवंतपूर-बेळगाव रेल्वे क्रमांक (06505) ही रेल्वे शुक्रवार दि. 30 रोजी बेंगळूर ( यशवंतपूर ) येथून रात्री 9.30 वा. निघणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी 8.05 वा. एक्स्प्रेस बेळगाव रेल्वे स्थानकात पोहोचेल. शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी बेळगाव-यशवंतपूर रेल्वे क्र. ( 06506 ) रात्री 10 वा. बेळगाव येथून निघालेली एक्स्प्रेस सकाळी 8.50 वा. यशवंतपूर येथे पोहोचणार आहे.
नवरात्रोत्सवात नोकरी निमित्त बेंगळूर येथे असणारे अनेक नागरिक गावी परततात. परंतु या दरम्यान रेल्वेला गर्दी होत असल्यामुळे अधिकचे पैसे खर्च करत नागरिकांना खासगी वाहतुक करावी लागते. प्रवाशांची सोय व्हावी व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नैऋत्य रेल्वेने उत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच बेंगळूरचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती.