शीतल हॉटेल परिसरात साचतोय कचऱयाचा ढिगारा
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजारमधील शीतल हॉटेलजवळील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानच्या परिसरात कचरा टाकून गलिच्छ बनविण्यात आले आहे. याठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सातत्याने तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली.
कचरा टाकण्यात आल्याने किडे, उंदीर, घुशींनी देवस्थानाची नासधूस केली आहे. त्यामुळे पूजाअर्चा विधी व देवळास प्रदक्षिणा घालण्यात अडचण होत आहे. याबाबत मनपाच्या आरोग्य अधिकाऱयांकडे दि. 10 मार्च 2021 रोजी निवेदन देऊन तक्रार केली होती. थळ देवस्थान परिसरात होणाऱया कचऱयाबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तरी याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
आता येणाऱया दसरा-दिवाळी सणानिमित्त भाविक मंदिरात येतात. दसरा-दिवाळीनिमित्त पूजाविधी करण्यात येत असतात, पण अशा दुर्गंधीयुक्त परिस्थितीत पूजा विधी कसे करावेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचे काम हाती घेऊन उपाययोजना राबविण्यात याव्यात. तसेच मंदिर परिसरात कचरा टाकण्यावर कायमस्वरुपी बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना प्रवीण कणेरी, दीपक खटावकर, अजित कोकणे, हेमंत हावळ, महेश खटावकर, नितीन चिकोर्डे, मनोज पतंगे, सुरेश पिसे, अमर कोपर्डे, निरंजन बोंगाळे, सुनील कणेरी, अशोक रेळेकर, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.









