नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात प्रथम समुद्रात असणाऱया बोगद्यातून बुलेट ट्रेन धावणार आहे. असा बोगदा बनविण्यासाठी टेंडर काढण्यात आले असून हा बोगदा समुद्रात सात किलोमीटर खोलीवर निर्माण करण्यात येणार आहे. या बोगद्याची लांबी 21 किलोमीटर असेल. अशा प्रकारचा बोगदा देशात प्रथम निर्माण होत आहे.
मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेटच्या मार्गात हा बोगदा असेल. तो संपूर्णपणे महाराष्ट्रात आहे. अशी बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढकाराने सुरु असलेला प्रकल्प असून तो जपानच्या आर्थिक आणि तांत्रिक साहाय्याने साकारला जात आहे. यासाठी अतिवेगवान रेल्वे कॉरीडॉर निर्माण करण्यात येत असून याच कॉरीडॉरमध्ये हा बोगदाही असेल.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलाच्या भूमीगत रेल्वे स्थानकापासून या बोगद्याचा प्रारंभ होईल. तो 21 किलोमीटरवर असणाऱया शीलफाटापर्यंत असेल. ठाण्यानजीच्या खाडीतून तो जाणार असून समुद्रसपाटीच्या खाली 7 किलोमीटर खोलीवर तो बांधण्यात येणार आहे. तो बनविण्यासाठी 13.1 मीटर व्यास असणारे कटरहेड असणाऱया टीबीएम यंत्राचा उपयोग केला जाईल. अशा तीन बोगदा खुदाई यंत्राचा उपयोग केला जाणार आहे. या बोगद्याचा 16 किलोमीटरचा भाग या यंत्रांच्या साहाय्याने तर उरलेला 5 किलोमीटरचा भाग नव्या ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
508 किलोमीटर धावणार बुलेट ट्रेन
मुंबई ते अहमदाबाद अशी ही बुलेट ट्रेन धावणार असून हे अंतर 508 किलोमीटर आहे. या ट्रेनचा 352 किलोमीटरचा प्रवास गुजरातच्या 9 तर महाराष्ट्राच्या 3 जिल्हय़ांमधून होईल. या प्रकल्पासाठी 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किलोमीटर इतका असेल. तर या बुलेट ट्रेनची संरचना 350 किलोमीटरचा ताशी वेग गाठण्याइतकी भक्कम असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर ही ट्रेन अवघ्या 2 तासात करणार आहे.









