केंद्र सरकारने केले नियमात परिवर्तन, परीक्षाही द्यावी लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कार किंवा टू-व्हीलर चालविण्यासाठी परवाना घेण्यापूर्वी लर्निंग लायसेन्स काढण्याचा नियम आहे. आता या नियमात केंद्र सरकारने परिवर्तन केले असून लर्निंग लायसेन्स काढण्यापूर्वी मार्ग शिष्टाचार (रोड एटिकेट्स्) शिकावे लागणार आहेत. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यापूर्वी प्रत्येकाला एका परीक्षेतही उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. यासंबंधीचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
देशात वाहनांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर अपघात, अपघाती दुर्घटना आणि रस्त्यांवरील संकटेही वाढली आहेत. या समस्या दूर करण्यासाठी नवे नियम करण्यात आले आहेत. प्रत्येकाने वाहन चालवायला शिकण्यापूर्वी मार्ग नियम आणि मार्ग शिष्टाचार शिकणे आवश्यक करण्यात आले आहे. या शिष्टाचारांची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
लर्निंग लायसेन्स केवळ मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग लायसेन्स प्रशिक्षण केंद्रातूनच काढावा लागणार असून त्यापूर्वीच इच्छुकाला मार्ग शिष्टाचार महिती असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. लर्निंन लायसेन्स मिळविण्यापूर्वी त्याला महत्वाच्या मुद्दय़ांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. लायसेन्स देणाऱया केंद्रांवर या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. वाहन चालकांना थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारे प्रशिक्षण घ्यावे लागणार असून ते समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर त्याला लर्निंग लायसेन्स आणि त्यानंतर मुख्य वाहनचलन अनुमतीपत्र (ड्रायव्हिंग लायसेन्स) काढता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
33 वर्षांनी नियमांमध्ये सुधारणा
वाहन चालविण्यासाठी लागणाऱया लायसेन्सच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने गेल्या 33 वर्षांमध्ये प्रथमच मोठय़ा सुधारणा करण्यात आल्या आहेत. लर्निंग लायसेन्स काढण्यापूर्वीचे प्रशिक्षण देण्यासाठी पोर्टलचीही व्यवस्था करण्यात आली असून या पोर्टलवर किंवा प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन हे प्रशिक्षण घ्यावे लागेल.
वाहन चालक प्रशिक्षण नियमही सुधारले
काही दिवसांपूर्वी मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांच्या कामकाजासंबंधीचे नियमही सुधारण्यात आले आहेत. वाहन चालविताना पेट्रोल किंवा डिझेलची बचत कशी करावी हे चालकांना शिकविले जाईल. यासाठीचे कौशल्य त्यांना शिकविले जाईल. वाहन आणि त्याचे चालन यांचे तंत्र अवगत व्हावे, तसेच चालकाची समज वाढावी अशा प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना केली जाईल. मार्ग वाहतूक शिक्षण, प्रथमोपचार, दुर्घटना होण्यामागची कारणे इंधन वाचविणे, मार्ग शिष्टाचार इत्यादी सर्व महत्वाच्या मुद्दय़ांचा समावेश या प्रशिक्षणात केला जाईल.









