मुंबई / वृत्तसंस्था
भारताचे चलन असणाऱया रुपयाची घसरण सुरुच असून शुक्रवारी त्याने आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्तर गाठला आहे. एका डॉलरच्या तुलनेत आता रुपया 81.24 रुपये या स्तरावर पोहचला आहे. शुक्रवारच्या एका दिवसात त्याच्या किमतीत 38 पैसे घट झाली. गुरुवारी व्यवहार संपले तेव्हा तो 80.86 या स्तरावर होता. अमेरिकेने आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केल्याने रुपयाची किंमत सातत्याने घटत आहे. अमेरिकेच्या व्याजदरवाढीमुळे भारतातील परकीय चलनसाठाही कमी झाला आहे. मात्र अशी स्थिती चिंताजनक नाही, असे अर्थतज्ञांचे मत आहे.
रुपयाची किंमत घसरल्याने अमेरिकेत पर्यटन करणे भारतीयांसाठी महाग होणार आहे. तसेच अमेरिकेत शिक्षणासाठी जाणेही महाग होणार आहे. विशेषतः कर्ज काढून अमेरिकेत शिकायला जाणाऱयांना भारतात कर्जफेड करताना आता अधिक परतफेड हप्ता द्यावा लागणार आहे. ही परिस्थिती तात्पुरती असल्याचेही मत व्यक्त होत आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्था मंदावल्याने जागतिक स्तरावर विकसनशील देशांपैकी अनेक देशांची स्थिती अशी झालेली आहे.
विदेशी चलनसाठा कमी झाल्यास त्या देशाच्या चलनाची किंमतही त्या प्रमाणात कमी होते. सध्या अमेरिकेतही मंदी आहे. परिणामी खेळते चलन वाढविण्यासाठी त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल बँक) व्याजदर वाढविलेले आहेत. परिणामी, अमेरिकेतून भारतात गुंतविल्या जाणाऱया डॉलरच्या प्रमाणात घट झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या चलनाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर होत आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये परकीय चलनसाठा वाढल्यास पुन्हा रुपया बळकट होऊ शकतो, अशीही शक्यता काही अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.









