सातारा : अविश्वासनीय वाटावी अशी घटना वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील दसवडी गावात घडलीय. बाह्य स्त्रोत कर्मचारी विकास सोनावले यांच्या या अजोड कामगिरीचे पंचक्रोशीसह तालुक्यातून कौतुक होत आहे.
गेल्या आठवड्यात अधून मधून कोसळणाऱ्या पाऊसधारा सोसाट्याचा वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. धोम धरणही जवळपास भरण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे पाण्याचा फुगवटा गावकुसापर्यंत आलाय. अशातच दसवडीच्या स्मशानभूमी जवळ धरणाच्या जलाशयाच्या आत ५०० ते ६०० मीटर अंतरावर मुख्य वाहिनीची वीजवाहक तार तुटल्यान वाईच्या पश्चिम भागातील कृषी पंपाचा, गावोगावच्या पाणी योजनांचा वीज पुरवठा खंडित झाला. स्वतःच्या गावात चिखली येथे नेमणुकीस असलेले बाह्य स्त्रोत कर्मचारी विकास रामचंद्र सोनावले तुटलेली तार पाहत होते. पण विजेच्या खांबापर्यंत पोहोचायचे तर धरणाच्या पाण्याचा फुगवटा, साप व अन्य जलचर यांचे भय, गवत झाडे झुडपे यातून वाट काढणे आवश्यक होते. शेतीपंप व विहिरीचा वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक गावातील लोकांना पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळेना झाले विद्युत वितरण कंपनीच्या विकास सोनवल्यांनी निर्णय घेतला अन् त्यांनी तुडुंब भरलेल्या धोम जलाशयात उडी घेतली. तब्बल सहाशे मीटर अंतर पोहत जाऊन विजेच्या खांबावर चढले, तारेची जोडणी केली आणि तेवढेच अंतर पोहत सुखरूप परतही आले, त्यांच्या या धाडसी सेवा वृत्तीचे छायाचित्रण काठावरील रोहित कुंभार करत होते त्यामुळे विकास यांचे कॅमेऱ्यात न मावणारे, विद्युत वितरण कंपनीचा गौरव वाढवणारे धाडस कौतुकास्पद ठरले.
Previous Articleलप्मी स्कीनने आणखी चार जनावरांचा मृत्यू
Next Article अजब सेवेसाठी आकारतो पैसे









