35 दिवसांच्या संपाला पूर्णविराम
विजयकुमार दळवी/चंदगड
गेल्या 35 दिवसांच्या प्रदीर्घ संपानंतर अथर्व व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या दालनात चंदगड तालुक्मयातील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून अथर्व-दौलत कारखाना सुरु होण्यातल्या अडचणी दूर झाल्यामुळे तालुक्मयात समाधान व्यक्त होत आहे.
चंदगड तालुक्मयात ऊस क्षेत्र प्रचंड असून सुमारे 16 ते 17 लाख टनाचे उत्पादन होते. अशा परिस्थितीत दौलत कारखाना बंद राहणे, शेतकऱयांच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. परंतु कामगारांनाही योग्य वेतन मिळणे तितकेच आवश्यक होते. दौलतच्या कामगारानी दौलत सुरु राहावा, यासाठी गेली तीन वर्षे 2011 च्या पगारातही काही प्रमाणात कपात सोसून काम केले. गेल्या तीन वर्षात चढत्या आलेखाप्रमाणे उसाचे गाळप झाले. गेल्या हंगामात 5 लाख 39 हजार टन उसाचे गाळप झाले. गेली तीन वर्षे पगारवाढीच्या आशेवर असलेल्या कामगारांना अपेक्षित पगारवाढ देण्यास अथर्व व्यवस्थापनाकडून टाळाटाळ सुरु झाली. 2011 च्या वेतनावर 25 टक्के पगारवाढ देण्याचे अथर्वचे चेअरमन मानसिंग खराटे यांनी जाहीर केले. परंतु ती वाढ कामगारांच्या दृष्टीने समाधानकारक नव्हती. त्यामुळे वाटाघाटीने प्रश्न सोडवावा, यासाठीही प्रयत्न झाले. परंतु कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सातत्याने थेट संवाद होत नसल्या कारणाने कामगारांना संपाचे हत्यार उपसावे लागले. या संपात कामगारांच्या असलेल्या दोन संघटना एकत्र आल्या. त्यामुळे संपाला धार आली. तालुक्मयात दौलत कारखाना चालला पाहिजे आणि कामगारांनाही योग्य वेतन मिळाले पाहिजे, या भूमिकेवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
कामगारांना पाठिंबा दिला. शिवाय व्यवस्थापनानेही दोन पावले पुढे टाकावीत, अशी मागणी केली. परंतु अपेक्षित तोडगा निघत नव्हता. यापूर्वी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठका झाल्या. त्या बैठकातून वादावादी पलीकडे कुणाच्याही पदरात काही पडले नव्हते. त्यामुळे कामगारांनी संपाची तीव्रता वाढवत ठेवली.
कामगारांना शह देण्यासाठी पर्यायी नोकर भरती करण्याचेही संकेत अथर्व व्यवस्थापनाने दिले. मुलाखतीही घेतल्या गेल्या. कामगारांवर अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. तथापि कामगारांना सद्य परिस्थितीत मिळणारे वेतन हे अत्यल्प आहे. यावर सर्वांचे एकमत झाले. अंतिम तोडगा निघावा यासाठी आमदार राजेश पाटील यांनी प्रथमच बैठकीत उपस्थित राहण्याचे जाहीर दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा बैठक झाली. दौलत हा चंदगड तालुक्मयाच्या अस्मितेचा प्रश्न होता. दौलत चालली पाहिजे यावर सर्वांचाच ठाम विश्वास आहे. म्हणूनच दौलत कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर देत असतानाही शेतकरी आपला ऊस दौलतलाच गाळपासाठी पाठवतात. त्यामुळे अथर्व व्यवस्थापनाने 39 वर्षाच्या कराराने दौलत कारखाना चालवायला घेतला असून तो सुरळीत चालू राहावा, यासाठी चंदगड तालुक्मयातल्या सर्व नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच वर्षागणिक गाळपाचे आकडे वाढत आहेत.
दौलतचे कामगारही केवळ कामगार नाहीत तर त्यातील 75 टक्के कामगार ऊस उत्पादक आहेत. त्यांच्या प्रयत्नानेही गाळपाचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे कामगारांचे हित जपले जावे. यासाठी एक अंतिम तोडगा निघावा. यासाठी चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजीमंत्री भरमू पाटील, माजी चेअरमन गोपाळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, सभासद संघटनेचे प्रा. विजयभाई पाटील, दौलतचे चेअरमन अशोक जाधव, व्हाईस चेअरमन संजय पाटील, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले, संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गणेश फाटक, प्रा. एन. एस. पाटील, तानाजी गडकरी, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, प्रादेशीक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, प्रदीप पवार, संजय देसाई आदीनी आपला बहुमोल वेळ देऊन कामगार आणि अथर्व प्रशासन यांच्यामध्ये सुयोग्य तोडगा काढला. 2019 च्या वेतनावर पुढील वर्षापर्यंत पन्नास टक्के वाढ कामगारांना द्यावी, हा तोडगा निघाला. अथर्व व्यवस्थापनानेही तो मान्य केला. त्यामुळे गेले 35 दिवस सुरू असलेल्या कामगारांच्या संपाला पूर्णविराम मिळाला असून लवकरात लवकर गाळपासाठी कारखाना सज्ज करण्याचा विडा कामगारांनी उचलला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
दौन्ही बाजूंनी सौहार्दाचे वातावरण असावे
कामगार आणि व्यवस्थापन यानी एकमेकांची सुखदुःखे समजून घेऊन पुढील वाटचाल केल्यास असे कटू प्रसंग पुढे येणार नाहीत, याची दक्षता दोन्ही बाजूने घेण्याची गरज असून यापुढेही सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व्यवस्थापन आणि कामगार यांनी प्रयत्न करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.









