आईने खाल्ल्यावर देतो प्रतिक्रिया . कडवट अन्न खाल्यास उतरतो चेहरा
लहान मुलांना हिरव्या भाज्या खाणे फारसे आवडत नाही, परंतु वैज्ञानिकांनी आता एक चकित करणारी गोष्ट शोधून काढली आहे. इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी जन्मापूर्वी म्हणजेच गर्भात असणारे भ्रूण देखील आईच्या आहारावर प्रतिक्रिया देत असल्याचा दावा केला आहे. आईने गाजर खाल्ल्यास या भ्रूणाचा चेहरा उजळून निघतो, तर हिरव्या भाज्या खाल्ल्यास चेहरा रडवा होतो. या संशोधनात जन्म न घेतलेल्या भ्रूणाच्या चेहऱयावरील हावभावासंबंधी संशोधन करण्यात आले आहे.

ब्रिटनच्या डुरहॅम विद्यापीठानुसार फीटल आणि नियोनेटल रिसर्च लॅबमध्ये एक संशोधन करण्यात आले असून ते महिलांच्या गर्भात वाढणाऱया भ्रूणावर आधारित होते. या संशोधनात जन्मापूर्वीच मूल स्वाद अन् गंधावर वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागत असल्याचे यात आढळून आले आहे. आहारात त्याची पसंत-नापसंत जन्मापूर्वीच विकसित होत असते.
100 महिलांवर संशोधन
सायकोलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे, या अहवालानुसार हे संशोधन 100 महिलांवर करण्यात आले असून 4डी अल्ट्रासाउंड स्कॅनद्वारे यासंबंधी माहिती कळाली आहे. सर्व महिला 18-40 या वयोगटातील होत्या आणि 32-36 आठवडय़ांच्या गरोदर होत्या. यातील 35 महिन्यांना कोबीने तयार केलेली कॅप्सूल खायला दिली, तर 35 महिलांना गाजराने तयार केलेली कॅप्सून देण्यात आली, उर्वरित महिलांना यातील कुठलीच कॅप्सूल देण्यात आली नव्हती.

गाजरानंतर चेहऱयावर हास्य
स्कॅनच्या दिवशी गाजर किंवा कोबी खाऊ नका आणि स्कॅनच्या 1 तासापूर्वी काहीच न खाण्याची आणि पिण्याची सूचना महिलांना करण्यात आली होती. महिलांनी कॅप्सून खाल्ल्याच्या 20 मिनिटांनी स्कॅन करण्यात आले असता ज्या महिलांनी गाजरयुक्त कॅप्सूल खाल्ली होती, त्यांच्या गर्भातील भ्रूणाच्या चेहऱयावर हास्य दिसून आले. तर कोबीयुक्त कॅप्सूल खाल्लेल्या महिलांच्या गर्भातील भ्रूणांचे चेहरे रडवे दिसून आले.
चव अन् गंध ओळखण्याची शक्ती
भ्रूणात चव अन् गंध समजण्याची किती क्षमता असते हे शोधण्याचा निर्णया आम्ही घेतला होता. या अध्ययनात गर्भावस्थेच्या अखेरच्या 3 महिन्यांमध्ये भ्रूण आईने खाल्लेल्या आहाराची चव ओळखण्याइतके प्रगल्भ होत असल्याचे दिसून आल्याचे मुख्य संशोधक बेजा उस्तुन यांनी सांगितले.









