केरळ उच्च न्यायालयाने रस्तेसुरक्षावरुन सरकारला फटकारले
वृत्तसंस्था/ कोची
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी राज्यात लागलेले बॅनर अन् झेंडय़ावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी आक्षेप व्यक्त केला आहे. रस्तेसुरक्षेप्रकरणी पोलीस आणि इतर अधिकाऱयांनी डोळे मिटून घेतले आहेत असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्यांवरील अवैध बॅनर आणि बोर्डाप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यादरम्यान न्यायमित्राकडून काँग्रेसच्या यात्रेसंबंधी भूमिका मांडण्यात आली. सुनावणीदरम्यान काँग्रेसचा थेट उल्लेख न करता न्यायालयाने टिप्पणी केली आहे.
एका विशेष राजकीय पक्षाकडून तिरुअनंतपुरम पासून त्रिसूर आणि त्यापुढील राष्ट्रीय महामार्गावर अवैध स्वरुपात बॅनर लावण्यात आले आहेत. पोलीस आणि इतर अधिकाऱयांना याची कल्पना आहे, तरीही त्यांनी डोळेझाक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत न्यायाधीश देवन रामचंद्रन यांच्या खंडपीठाने फटकारले आहे.
एका विशेष पक्षाने केरळमध्ये यात्रेदरम्यान अवैध स्वरुपात मोठय़ा संख्येत बॅनर, बोर्ड अन् झेंडे लावले आहेत अशी माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. अवैध स्वरुपात लावण्यात आलेल्या या गोष्टी वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत. विशेषकरून दुचाकी वाहनांना यामुळे धोका असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
मुख्य राजकीय पक्ष अशाप्रकारच्या अवैध कृतींमध्ये सामील असल्याचे दिसून येते. विचार न करता उचललेले पाऊल अन् अधिकाऱयांची उदासीनता या न्यायालयाला केरळला सुरक्षित स्थान करण्याच्या शपथेपासून रोखू शकत नसल्याचे सुनावणीवेळी न्यायाधीशांनी म्हटले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या केरळमध्ये आहे. 30 सप्टेंबर रोजी ही यात्रा कर्नाटकात पोहोचणार आहे. राहुल गांधी या पदयात्रेचे नेतृत्व करत आहे.









