बिहारमध्ये अमित शाह यांचे भाजप कार्यकर्ते-समर्थकांना उद्देशून विधान ः 2024 मध्ये मोठा विजय मिळवू
वृत्तसंस्था/ पूर्णिया
बिहाराच्या राजकारणात मागील महिन्यात झालेल्या उलथापालथीमुळे भाजपला सत्ता गमवावी लागली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचा दौरा केला असून सीमांचल क्षेत्रातील पूर्णिया येथे शुक्रवारी जनभावना सभेला संबोधित केले. माझ्या दौऱयामुळे लालूप्रसाद यादव अन् नितीश कुमार या जोडीच्या पोटात दुखू लागले आहे. नितीश कुमारांनी पंतप्रधान पदाच्या लालसेपोटी भाजपचा विश्वासघात केला. परंतु ते कधीच पंतप्रधान होऊ शकणरा नाहीत. तसेच बिहारमध्ये देखील त्यांचे सरकार चालणार नाही. नितीश कुमार हे लालूंचा विश्वासघात करून काँग्रेससोबत जाऊ शकतात असे शाह यांनी म्हटले आहे. हा सीमावर्ती जिल्हा हिंदुस्थानचा हिस्सा असून येथे कुणालाच घाबरण्याची गरज नाही. कारण केंद्रात मोदींचे सरकार आहे. या सभेला झालेली गर्दी लालू-नितीश सरकारला एकप्रकारचा इशारा असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
लालू अन् नितीश हे मी भांडणं लावून देण्यासाठी सीमांचलमध्ये आल्याचे म्हणत आहेत. परंतु भांडण लावून देण्यासाठी लालू यादव पुरेसे आहेत. जीवनभर लालूंनी हेच काम केले आहे. लालू यादव सत्तेत सामील झाल्याने राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे शाह म्हणाले.
सेवा अन् विकासाच राजकारण
बिहारची भूमी परिवर्तनाचे केंद्र राहिली आहे. इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्य आंदोलन असो किंवा इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरोधातील आंदोलन बिहारच्या भूमीतूनच सुरू झाले. भाजपचा विश्वासघात करत लालूंच्या मांडीवर बसून नितीश कुमारांनी स्वार्थ अन् सत्तेचे राजकारण दाखवून दिले आहे. त्यांच्याविरोधातील बिगुल फुंकण्याची सुरुवात देखील याच भूमीतून होणार आहे. स्वार्थ अन् सत्तेच्या राजकारणाऐवजी आम्ही सेवा अन् विकासाच्या राजकारणाचे पाईक आहोत. सत्तेचा स्वार्थ अन् गटबदल करून नितीश कुमार कधीच पंतप्रधान होऊ शकत नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
नितीश लालूंनाही दगा देणार
नितीश कुमार यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून लोकांना फसविले आहे. सर्वप्रथम ते जनता पक्ष (देवीलाल गट) सोबत केले, त्यानंतर लालू यादवांना त्यांनी दगा दिला. नितीश कुमार हे लालूंना वाऱयावर सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतील अन् लालू हात चोळत बसतील. नितीश कुमार यांनी देशातील प्रतिष्ठित समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचाच विश्वासघात केला होता. त्यांच्या खांद्यावर बसून नितीश यांनी समता पक्ष निर्माण केला, जॉर्ज फर्नांडिस यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना हटवून स्वतः अध्यक्ष झाले. शरद यादवांसोबत देखील त्यांनी असाच प्रकार केला. त्यानंतर भाजपला दगा दिला, जीतनराम मांझी, रामविलास पासवान यांच्यासोबत कपट केले. नितीश कुमार यांनी खुर्ची वाचविण्याशिवाय काहीच केले नसल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
बिहारमध्ये जंगलराजचा धोका
नितीश कुमार कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लालू-नितीश यांना जनताच धडा शिकविणार आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार आहे. लालू अन् नितीश ही जोडी एकत्र आल्यापासून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. नितीश यांच्यामुळे बिहारमध्ये जंगलराज निर्माण होण्याचा धोका घोंगावू लागल्याचे शाह यांनी म्हटले आहे.









