माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतली सदिच्छा भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाठी भरीव निधीची तरतूद करावी. तसेच राजर्षी शाहूंचे विचार-कार्य जगभरात पोहचविण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष उप्रकम राबवावेत अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी संभाजीराजे यांनी मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच उर्वरीत उमेदवारांच्या नियुक्तीकरीता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्याची मागणी केली. याबरोबरच गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी फोर्ट सर्कीट टूरिझम, पर्यटन विकास आदी विषयांवरही त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, कॅ. अभिजीत अडसूळ, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव आदी उपस्थित होते.