प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील पाली-खानू येथे रानात गवत कापण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. गंभीर जखमीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत जखमी झालेल्याचे सुरेश गंगाराम सुवारे (55) असे नाव आहे. सुवारे हे दुपारच्या सुमारास रानात गवत कापण्यासाठी गेले होते. त्यावेळेस बेसावध असलेल्या सुवारे यांच्या पाठीमागून आलेल्या बिबट्याने झडप घातली. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांनी जोरदार आरडाओरड केल्यामुळे बिबट्या बिथरला आणि रानात पळून गेला. जखमी अवस्थेतील सुरेश सुवारे यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले.