प्रतिनिधी /बेळगाव
गर्भवती महिला आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मातृवंदना योजना राबविली गेली आहे. 2017 पासून गर्भवतींसाठी ही योजना अंमलात आली आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 1 लाख 63 हजार 250 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. यासाठी 66 कोटी 34 लाख 46 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना महिलांसाठी सफल होताना दिसत आहे.
गर्भवती महिलांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत लाभ घेतलेल्या महिलांची संख्या समाधानकारक आहे. गर्भवती महिलांना त्यांच्या पालनपोषणासाठी तीन टप्प्यात 5 हजार रुपये दिले जातात. पहिला हप्ता 1 हजार रुपये, दुसरा आणि तिसरा 2 हजार रुपये असे एकूण 5 हजार रुपये लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जातात.
ग्रामीण भागातील गोरगरीब गर्भवती महिलांना मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तात्काळ काम करावे लागते. अशा गर्भवती महिला कुपोषित राहून त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर परिणाम होतात. अशा परिस्थितीत महिलांचे आरोग्य सुधारावे, यासाठी मातृवंदना योजना सक्रियपणे राबविली आहे. योजनेचा लाभ घेणाऱया महिलांची संख्या अधिक आहे. महिला व बालकल्याण खात्यांतर्गत अंगणवाडी केंद्रांतून महिलांचा पाठपुरावा केला जात आहे. गर्भवती महिलांबरोबरच बालकांचे आरोग्य सुधारावे व माता मृत्यू आणि बाल मृत्यू प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना पोहोचविली जात आहे.
गर्भवती महिलांना सोयीस्कर
मागील पाच वर्षांत दीड लाखांहून अधिक गर्भवती महिलांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला आहे. महिलांना पौष्टिक आहार, औषधे आणि इतर आरोग्याच्या खर्चासाठी हे आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यामुळे गर्भवती महिलांना सोयीस्कर होत आहे.
-रेवती होसमठ (जिल्हा कार्यक्रम अधिकारी)









