चंदीगड विद्यापीठ एमएमएस प्रकरण ः आरोपी विद्यार्थिनीचे 12 आक्षेपार्ह व्हिडीओ प्राप्त
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाबच्या चंदीगड विद्यापीठाच्या व्हिडीओ लीक प्रकरणात पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून 12 व्हिडीओ रिकव्हर केले आहेत. हे आक्षेपार्ह व्हिडीओ याच विद्यार्थिनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मोबाईलनंतर विद्यार्थिनीचा लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे. आरोपी विद्यार्थिनीला सन्नी मेहता आणि रंजन वर्मा हे ब्लॅकमेल करत होते, असे प्रारंभिक तपासातून समोर आले आहे.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अन्य विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ या विद्यार्थिनीकडून मागविले जात होते. तर आरोपींच्या मोबाईलवरून दिल्ली, मुंबई आणि गुजरातमध्ये सातत्याने कॉल करण्यात आल्याने हे आरोपी मोठय़ा नेटवर्कमध्ये सामील असल्याचे संकेत मिळाले आहेत.
व्हिडीओ लीक प्रकरणातील आरोपी विद्यार्थिनी आणि तिला ब्लॅकमेल करणारे सन्नी मेहता, रंजन वर्मा याच्यासह आणखी एका आरोपीचा सुगावा लागला आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून काही व्हॉट्सऍप चॅट रिकव्हर करण्यात आले आहेत.
मोबाईलवर व्हिडीओ मागविल्यावर रंजन आणि सन्नी हे व्हिडीओ अन्य गॅझेटमध्ये सेव्ह करत होते. सन्नी आणि रंजनला सोबत घेत पंजाब पोलिसांचे पथक तपासासाठी शिमला येथे पोहोचले आहे. आरोपींच्या घरात अन्य उपकरणांचा शोध घेतला जात आहे.
सन्नी मेहता हा आरोपी विद्यार्थिनीचा बॉयप्रेंड होता. तिने सन्नीला स्वतःचा आक्षेपार्ह व्हिडीओ पाठविला होता. सन्नीने हा व्हिडीओ स्वतःचा मित्र रंजन वर्माला दाखविला होता. त्यानंतर या दोघांनी विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अन्य विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ न पाठविल्यास तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.
विद्यार्थिनींना धमकी
चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना आता देखील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मिळत आहे. या विद्यार्थिनींना वेगवेगळय़ा मोबाईल क्रमांकांद्वारे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संदेश पाठविण्यात येत आहेत. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी 3 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व गुरप्रीत कौर दियो करत आहेत. या पथकात दोन महिला अधिकारीच सामील आहेत.









