
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एसएमवाय ग्रुप बेळगाव आयोजित ऑल इंडिया निमंत्रितांच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोवा पोलीस संघाने मराठा स्पोर्ट्स मुंबई संघाचा अटीतटीच्या लढतीत टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम चषकासह 1 लाखाचे बक्षीस पटकाविले. अमित बांदेकर उत्कृष्ट खेळाडू, निखिलेश नाईक उत्कृ÷ गोलरक्षकाचा मानकरी ठरला.
माळमारूती येथील लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट्स टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी, मृणाल हेब्बाळकर, अमित पटवेगार व माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी राहुल जारकीहोळी यांनी चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत केरळ, पुणे, मुंबई, गुजरात, गडहिंग्लज, कोल्हापूर, सांगली, हुबळी, गोवा व बेळगावातील 24 संघांना निमंत्रित करण्यात आले होते.
या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढय़ गोवा पोलीस संघाने हुबळी प्रेन्ड्स संघाचा 7-0 असा पराभव केला. गोवा पोलीसतर्फे कुणाल साळगावकर, सुदिन नाईक, रोहित टी. यांनी प्रत्येकी 2 तर स्टीफन मार्टिंनने 1 गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात मराठा स्पोर्ट्स मुंबई संघाने फास्ट फॉरवर्ड बेळगाव संघाचा टायब्रेकरमध्ये 1-0 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यावेळी मान्यवरांना गोवा पोलीस, मराठा स्पोर्ट्स मुंबई संघाच्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. या सामन्यात पहिल्या सत्रात 32 व्या मिनिटाला गोवा संघाच्या स्टीफन मार्टीनच्या पासवर सच्चिदानंद साटेलकरने सुरेख गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱया सत्रात मुंबईने आक्रमक खेळ केला. 48 व्या मिनिटाला मुंबईला फ्र ाr किक मिळाली. त्यावर मराठा स्पोर्ट्स मुंबईच्या विकी राजपूतने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारीत वेळेत बरोबरी झाल्याने पंचांनी टायबेकरचा अवलंब केला. त्यामध्ये गोवा पोलीसने 5-4 अशा गोलफरकाने विजय संपादन करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम चषक पटकाविला. गोवातर्फे कुणाल साळगावकर, सिद्धांत नाईक, स्टिफन मार्टिंन्स, रोहित टोडट यांनी गोल केले तर मुंबईतर्फे राहुल कडलक, रोहन अडनायक व विकी राजपूत यांनी गोल केले. या टायब्रेकरमध्ये गोवा पोलीसचा गोलरक्षक निखिलेश नाईकने अडविलेल्या गोलमुळे गोवा पोलीसने मुंबईवर मात केली.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आमदार अनिल बेनके, अजिम पटवेगार, मतिन शेख, यासिन बॉम्बेवाले, सुफियान तोपजी, जमिल गवस आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोवा पोलीस संघाला 1 लाख 11 हजार 111 रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या मराठा स्पोर्ट्स संघाला 55 हजार 555 रूपये रेख व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अमित बांदेकर मराठा स्पोर्ट्स मुंबई व उत्कृष्ट गोलरक्षक निखिलेश नाईक गोवा पोलीस यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी एसएमवाय ग्रुपच्या पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.









