जगातही शोकमग्न वातावरण, पार्थिव विंडसर कॅसलमध्ये भूमीच्या आधीन
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ (दुसऱया) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून ब्रिटनच्या लक्षावधी नागरीकांनी सात दशकांहून अधिक सर्वोच्च पदावर राहण्याचा जागतिक विक्रम करणाऱया आपल्या लाडक्या महाराणींना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला आहे. सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजता महाराणींचे पार्थिव शासकीय सन्मानात भूमीच्या आधीन करण्यात आले. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख असेच इतर क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते.

या हृदय हेलावणाऱया प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी सहस्रावधी नागरिकांनीही अंत्यसंस्कारस्थळी उपस्थिती लावली होती. तर जगभरात शतकोटय़वधी लोकांनी हा प्रसंग टीव्हीवर पाहिला. यावेळी असंख्याना अश्रू आवरणे कठीण जात होते.
आज्ञेsय इंग्लंडमधील विंडसर कॅसल येथील वेस्टमिनिस्टर ऍबे मधील ऐतिहासिक चॅपेल येथे महाराणींचे दिवंगत पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारीच त्यांना चिरनिद्रा देण्यात आली. महाराणींची शवपेटिका वेस्टमिनिस्टर ऍबे येथे आणली जात असताना ‘गॉड सेव्ह द किंग’ हे ब्रिटनचे नव्या स्वरुपातील राष्ट्रगीत वाजविण्यात येत होते. तसेच लंडनचे भूषण मानल्या जाणाऱया एलिझाबेथ टॉवरवरील प्रचंड घंटेचा (द बिग बेन) नाद मिनिटाला एकदा असा 96 वेळा करण्यात आला. महाराणींना 96 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले होते. त्याचे प्रतीक म्हणून 96 वेळा घंटानाद करण्यात आला.
राजघराण्याच्या परंपरेत अंत्यसंस्कार
भारताच्या वतीने महाराणींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह विदेश विभाग सचिव विनय क्वाट्राही उपस्थित होते. महाराणींचे पार्थिव असलेल्या शवपेटिकेभोवती ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रतीक असणारा ध्वज पांघरण्यात आला होता. तसेच विविध राजघराण्यांच्या निवासस्थानातून आणलेल्या फुलांनी शवपेटिका सजविण्यात आली होती. महाराणींना त्यांच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी भेट देण्यात आलेला राजमुकूट तसेच राजवस्त्रेही आणण्यात आली होती. राजघराण्याच्या सर्व परंपरांचे तंतोतंत पालन अत्यसंस्कार विधीप्रसंगी करण्यात आले. 1953 मध्ये त्यांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम झाला होता.
डेव्हीड हॉईल यांचा शोकसंदेश
अंत्यविधी होण्यापूर्वी वेस्टमिनिस्टर ऍबेचे पीठाधिकारी (डीन) डेव्हीड हॉईल यांनी शोकसंदेशाचे वाचन केले. ‘महाराणी एलिझाबेथ यांचा विवाह आणि राज्यारोहण समारंभ याच स्थानी झाला. आज आपण सर्वजण येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलो आहोत. उपस्थितांमध्ये ब्रिटनचे नागरिक, राष्ट्रकुल देशांमधील प्रतिनिधी आणि जगातील इतर देशांमधील मान्यवर जमले आहेत. महाराणींच्या प्रदीर्घ आयुष्यातील घटना, त्यांनी केलेली निःस्वार्थी सेवा, त्यांचे औदार्य आणि समाजाप्रती असलेला आदर यांचे स्मरण करण्यासाठी आपण येथे आलो आहोत. महाराणींना विश्वनियंत्याच्या दयेच्या स्वाधीन करत आहोत. त्यांचा भक्तीभाव आणि ख्रिश्चन धर्माप्रति त्यांची असलेली निष्ठा आमच्या सदैव ध्यानात राहील, असे भावोत्कट उद्गार डेव्हीड हॉईल यांनी काढले.
एक तासाचा कार्यक्रम
अंत्यविधीचा कार्यक्रम एक तासाहून काही अधिक काळ चालला होता. यावेळी पारंपरिक गाणी वाजविण्यात आली. विशिष्ट प्रकारच्या संगीताचे सूर आळविण्यात आले. संगीताच्या काही धून या प्रसंगासाठी विशेषत्वाने रचण्यात आल्या होत्या. राष्टकुल संघटनेचे महासचिव बॅरोनेस पेट्रीशिया स्कॉटलंड यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पवित्र बायबलमधील उताऱयांचे पठण केले. महाराणींच्या विवाहाच्या प्रसंगी गाण्यात आलेले एक गीत यावेळीही गाण्यात आले.
सरावामुळे शिस्तबद्ध कार्यक्रम
महाराणींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम घडय़ाळाच्या काटय़ावर दृष्टी ठेवून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि समयबद्ध पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गेले 10 दिवस कसून सराव करण्यात आला होता. त्यांचा मृत्यू 8 सप्टेंबर या दिवशी झाला होता. त्यानंतर एक दिवसात अंत्यसंस्काराच्या शेवटच्या सेवादिनाच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या सरावाला प्रारंभ करण्यात आला होता.
सारे जग हळहळले
ड एलिझबेथ महाराणींच्या अंत्यसंस्कार कार्यक्रम पहिला कोटय़वधी लोकांनी
ड राष्ट्रकुल संघटनेतील देशांच्या प्रमुखांसह मान्यवर अंत्यविधीला उपस्थित
ड ब्रिटिश राजघराण्याच्या पारंपरिक प्रथेनुसार कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचलन









