प्रक्रिया झाली पूर्ण ः पूत्र ‘करण’कडे एसीसीची जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी सिमेंट क्षेत्रातील दिग्गज अंबुजा आणि एसीसी सिमेंटच्या अधिग्रहणाची प्रक्रिया अखेर पूर्ण केली असल्याची माहिती आहे. 51.79 हजार कोटी रुपये या व्यवहारासाठी अदानी यांनी मोजले असून आता अदानी यांच्या ताफ्यात या दोन्ही कंपन्या असणार आहेत.
पूत्र करणकडे एसीसीची धुरा
शुक्रवार 16 सप्टेंबरला याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली आहे. याचदरम्यान एसीसीच्या चेअरमनपदाची धुरा गौतम अदानी यांनी आपले पूत्र बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत 35 वर्षीय करण अदानी याच्याकडे सोपवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सध्याला ते अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे सीईओ आहेत. तर दुसरीकडे गौतम अदानी हे अंबुजा सिमेंटचे चेअरमन बनले आहेत.
सिमेंट उद्योगात दुसरा मोठा समूह
या ताज्या अधिग्रहणानंतर अदानी समूह देशातील एकंदर सिमेंट उत्पादनात दुसऱया नंबरवर राहिला आहे. तर पहिल्या नंबरवर आदित्य ग्रुपचा अल्ट्राटेक सिमेंट हा राहिला आहे. अलीकडेच झालेला अंबुजासंबंधीतचा व्यवहार हा पायाभूत सुविधा आणि साहित्याच्या विश्वातला अदानी समूहाचा सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे.
20 हजार कोटी उभारणार
याचदरम्यान समूह आगामी काळात कन्वर्टीबल वॉरंटस्च्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचेही सांगितले जात आहे. याचा वापर हा सिमेंट उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केला जाणार असून 2030 पर्यंत भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
होलसीम गाशा गुंडाळणार
होलसीमची एसीसी आणि अंबुजा सिमेंटमध्ये मोठी हिस्सेदारी होती. 17 वर्षापूर्वी भारतात आपला सिमेंट व्यवसाय सुरु केला होता. आता अदानी समूहाने त्यावर कब्जा मिळवल्याने होलसीमला गाशा गुंडाळावा लागेल.









