काँग्रेसमधून निवडून येणारे आमदार भाजपमध्ये
प्रतिनिधी /मडगाव
नुवे मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला, परंतु या मतदारसंघाला पक्षांतराचे ग्रहण लागले आहे. काँग्रेसमधून निवडून येणारे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात. गेल्यावेळी विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर आत्ता आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतरांच्या ग्रहणातून हा मतदारसंघ मार्गक्रमण करीत आहे.
आपणास निवडून दिल्यास आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याची ग्वाही आलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नुवेच्या मतदारांना दिली होती. त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना निवडून दिले होते. मात्र, एक वर्ष होण्याच्या आधीच त्यांनी पक्षांतर केले. पक्षांतर करण्यामागची कारणे त्यांनी देताना, आपल्या नुवे मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांकडून पक्षांतर करण्यास विरोध होता तर काही कार्यकर्त्यांच्या मते भाजपमध्ये प्रवेश केल्यास, विकासकामांना गती मिळणार असल्याचे मत मांडले होते. शेवटी मतदारसंघाचे हित लक्षात ठेऊन आपण पक्षांतर केल्याचे ते आज सांगत आहे.
मुळात आलेक्स सिक्वेरा यांचे वय लक्षात घेता ते भविष्यात आणखीन निवडून लढविण्याची शक्यता कमीच वाटते. जर आरोग्याने साथ दिली तर आपण पुढील निवडणूक लढविणार असल्याचे देखील त्यांनी पक्षांतर केल्यानंतर विधान केले आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षांतर केले असावे अशी शक्यता देखील नुवे मतदारसंघातून व्यक्त होत आहे.
विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विल्प्रेड डिसा हे तरूण आमदार होते व त्यांना राजकारणात उज्ज्वल भविष्य होते. मात्र, त्यांनी जो पक्षांतराचा निर्णय घेतला, त्याचे परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावे लागले. मतदारांनी त्यांचा पराभव केला. यावर भाष्य करताना आलेक्स सिक्वेरा म्हणतात की, आपण म्हणजे विल्प्रेड डिसा नव्हे. विल्प्रेड डिसा व आपल्यात प्रचंड फरक आहे. मात्र, शेवटी निवडणुकीत मतदार हा राजा असतो. मतदारांना ग्राहय़ धरता येत नाही व नुवे मतदारांनी ते यापूर्वी देखील सिद्ध करून दाखविले आहे.
मिकी पाशेको हे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांची पार्श्वभूमी देखील पक्षांतराचीच आहे. मिकी पाशेको हे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना खुप जवळचे बनले होते. त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारात ते मंत्री झाले. पण, नुवेच्या मतदारांनी त्यांना सुद्धा निवडणुकीत पाडले. हा इतिहास आहे. त्यामुळे नुवे मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पक्षांतर करणाऱया आमदारांना मतदार माफ करीत नाही हे स्पष्ट आहे.
नुवे मतदारसंघ हा ख्रिस्ती मतदारांचा वर्चस्व असलेला मतदारसंघ. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला कोणतेच स्थान नाही. तरी सुद्धा येथील आमदार जोखीम पत्करून पक्षांतर करतात आणि निवडणुकीत त्याचे परिणाम भोगतात.
आलेक्स सिक्वेरा यांना प्रचंड राजकीय अनुभव आहे. काँग्रेस सरकारात ते वीजमंत्री होते. आत्ता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, त्यांची ज्येष्ठता पाहून त्यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना मंत्रीपद मिळणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.









