राज्यांच्या पर्यटनमंत्र्यांची धर्मशाळा येथे परिषद
वृत्तसंस्था / धर्मशाळा
देशाला लवकरच राष्ट्रीय पर्यटन धोरण मिळणार आहे. या धोरणाच आराखडा तयार करण्यात आला असून धोरण जाहीर करण्याची मुदतही निश्चित झाल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी दिली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील एक वर्षापर्यंत जी20 च्या देशात 250 परिषदांचे आयोजन होणार आहे. या सर्व परिषदांचे आयोजन देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय पर्यटन धोरण अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जाहीर केले जाणार आहे. याचा पूर्ण मसुदा तयार झाला आहे. मसुदा निश्चित करण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय करण्यात आला आहे. राष्ट्रीय पर्यटन धोरणाच्या अंतर्गत इको टूरिझम, होम स्टे, वाइल्ड लाइफ, वेलनेस, आयुर्वेद आणि मेडिकल व्हॅल्यू टूरिझमला चालना देण्यात येणार असल्याचे जी. किशन रेड्डी यांनी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे आयोजित राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनापूर्वी प्तसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पर्यटन मंत्रालयाने रेल्वेचे 3 हजार डबे आरक्षित केले आहेत. याच्या माध्यमातून देशाच्या विविध 15 सर्किटमध्ये विशेष रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. या सर्किटमध्ये रामायण सर्किट, आंबेडकर सर्किट, बुद्ध सर्किट, हिमालयीन सर्किटचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.









