आझाद गल्ली येथील घटना, भामटय़ांचा शोध जारी
प्रतिनिधी/ बेळगाव
आठवडी बाजारात जोंधळे विकण्यासाठी चलवेनट्टी (ता. बेळगाव) हून आलेल्या एका शेतकरी महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या अंगावरील दागिने पळविण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी आझाद गल्ली येथे ही घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेजवरून भामटय़ांचा शोध घेण्यात येत आहे.
लक्ष्मी सिद्धाप्पा पाटील (वय 50, रा. चलवेनहट्टी) या महिलेच्या अंगावरील दोन तोळय़ाचे मंगळसूत्र व कर्णफुले असे दागिने भामटय़ांनी पळविले आहेत. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर पुढील तपास करीत आहेत.
लक्ष्मी या शनिवारी आठवडी बाजारानिमित्त जोंधळे विकण्यासाठी बेळगावला आल्या होत्या. काकतीवेसवर दोघा भामटय़ांनी त्यांना गाठले. त्यानंतर लक्ष्मी यांनी विक्रीसाठी आणलेले अर्धे जोंधळे विकल्यानंतर उरलेले जोंधळे विकण्यासाठी त्या पुढे पांगुळ गल्लीमार्गे आझाद गल्लीकडे निघाल्या. तेव्हा त्यांच्यासोबत भामटेही गेले. वाटेत त्यांनी लक्ष्मी यांना विश्वासात घेत आम्हीही तुमच्यासारखेच दागिने करून घेणार आहोत, असे सांगितले.
पुढे भामटय़ांनी लक्ष्मी यांना दागिने काढून दाखवण्यास सांगितले. ते बघून झाल्यानंतर ‘आजकाल दिवस वाईट आहेत. कोणी तरी ते दागिने पळवतील, हे अंगावर घालू नका, आम्ही रुमालात बांधून देतो, तुमच्याजवळ ठेवून घ्या’, असे सांगत दागिने रुमालात बांधून दिल्याचे नाटक केले. भामटे तेथून निघून गेल्यानंतर थोडय़ा वेळाने लक्ष्मी यांनी रुमालाची गाठ सोडली. त्यावेळी त्याच्यात दागिने नव्हते. वाळू होती. त्यामुळे आपण फसलो गेलो हे त्यांच्या लक्षात आले. भामटय़ांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









