रजत पाटीदारचे शतक, न्यूझीलंड अ दिवसअखेर 1 बाद 20
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर यजमान भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाला विजयासाठी 396 धावांचे कठीण आव्हान दिले. भारत अ संघाच्या दुसऱया डावात रजत पाटीदारने नाबाद शतक (109) तर कर्णधार पांचाळ, ऋतुराज गायकवाड आणि सर्फराज खान यांनी अर्धशतके झळकविली.
तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना यापूर्वी जिंकून बरोबरी साधली आहे. या शेवटच्या निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने पहिल्या डावात 293 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंड अ संघाचा पहिला डाव 237 धावात आटोपला. भारत अ संघाने पहिल्या डावात 56 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारत अ संघाने दुसऱया डावात दमदार फलंदाजी केली. त्यांनी 7 बाद 359 डावावर डावाची घोषणा करत न्यूझीलंड अ संघाला विजयासाठी 436 धावांचे कठीण उद्दिष्ट दिले. दिवसअखेर न्यूझीलंड अ संघाने दुसऱया डावात 14 षटकात 1 बाद 20 धावा जमविल्या.
भारत अ संघाच्या दुसऱया डावामध्ये कर्णधार प्रियांक पांचाळने 134 चेंडूत 6 चौकारासह 62, ऋतुराज गायकवाडने 164 चेंडूत 11 चौकारासह 94, सर्फराज खानने 74 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह 63 आणि रजत पाटीदारने 135 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारासह नाबाद 109 धावा झळकविल्या. पांचाळ आणि गायकवाड यांनी दुसऱया गडय़ासाठी 122 धावांची भागीदारी केली. पांचाळ बाद झाल्यानंतर गायकवाडने पाटीदारसमवेत तिसऱया गडय़ासाठी 102 धावांची तर सर्फराज खानने पाटीदारसमवेत चौथ्या गडय़ासाठी 108 धावांची भर घातली. भारत अ ने आपला दुसरा डाव 85 षटकात 7 बाद 359 धावावर घोषित केला. न्यूझीलंड अ संघातर्फे रचिन रविंद्रने 65 धावात 3 तर वॉकरने 64 धावात 2 तसेच सोलिया आणि ब्रुस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
न्यूझीलंड अ संघाने खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर दुसऱया डावात 1 बाद 20 धावा जमविल्या. सौरभ कुमारने सलामीच्या रचिन रविंद्रला 12 धावावर पायचित केले. या सामन्यात भारत अ संघाचे पारडे जड असून न्यूझीलंड अ संघ रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राहण्यासाठी प्रयत्न करेल.
संक्षिप्त धावफलक ः भारत अ प. डाव सर्वबाद 293, न्यूझीलंड अ प. डाव सर्वबाद 237, भारत अ. दु. डाव 85 षटकात 7 बाद 359 डाव घोषित (पाटीदार नाबाद 109, पांचाळ 62, गायकवाड 94, सर्फराज खान 63, रचिन रविंद्र 3-65, वॉकर 2-64, सोलिया 1-43, ब्रुस 1-40), न्यूझीलंड अ दु. डाव 14 षटकात 1 बाद 20 (रचिन रविंद्र 12, कार्टर खेळत आहे 6, वॉकर खेळत आहे 0, सौरभ कुमार 1-13).









