नवीन उपग्रह प्रतिमेतून माहिती उघड, गोगरा-हॉटस्प्रिंग भागातील चौकीमध्ये आता शुकशुकाट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य गोगरा-हॉट स्पिंग येथे वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून आपल्या स्थितीपासून 3 किमी मागे गेले आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या सॅटेलाइट इमेजमधून ही बाब समोर आली आहे. मे 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव वाढल्यानंतर भारत-चीनने पेट्रोलिंग पॉईंट -15 जवळ आपले अतिरिक्त सैन्य तैनात केले होते. यावषी 17 जुलै रोजी भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 16 वी फेरी झाली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार 8 सप्टेंबर 2022 पासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंत 13 सप्टेंबरला सैन्यमाघार पूर्ण झाली. कराराअंतर्गत भारतीय लष्कराने भारतीय हद्दीतील आपल्या दोन चौक्मया हटवल्या आहेत.
उपग्रह प्रतिमांमध्ये गोगरा-हॉट स्पिंग परिसरात चिनी पोस्ट विभक्त होण्यापूर्वीची स्थिती स्पष्टपणे दिसत आहे. तसेच नवीनतम उपग्रह प्रतिमेमध्ये सदर पोस्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले असून त्याठिकाणी शुकशुकाट पसरला आहे. दोन्ही देशांमधील संमतीनुसार आता सैनिक या भागात गस्त घालू शकत नाहीत. चिनी सैन्याने येथे खूप मोठी फौज दाखल करत आपली ताकद वाढवली होती. त्यानंतर भारतानेही आपली ताकद सिद्ध करण्यासाठी फौजफाटा वाढवला होता. तसेच लष्करी पातळीवरील चर्चेच्या माध्यमातून चीनवर वारंवार दबाव टाकला होता. पूर्वी भारतीय लष्कर या भागात गस्त घालत असे. पण 2020 मध्ये चीनच्या घुसखोरीनंतर येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता डेमचोक आणि देपसांग भागातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ऑगस्ट 2021 मध्ये गस्त बिंदू 17 वरून माघार
8 सप्टेंबर रोजी दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांचे सैन्य या ठिकाणाहून नियोजनबद्ध पद्धतीने माघार घेतील असे म्हटले आहे. यापूर्वी, फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांच्या सैन्याने ऑगस्टमध्ये पँगाँग लेक आणि गोगरा हॉट स्पिंगच्या गस्त बिंदू 17 वरून माघार घेतली होती. जून 2020 रोजी गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली होती, ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते आणि चीनचे सुमारे 40 ते 45 सैनिक मारले गेले होते.
तणाव कमी होण्याचे संकेत
पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने सीमेवर 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतानेही जवळपास तेवढेच सैनिक तैनात केले असून चीनच्या कोणत्याही कृतीला उत्तर देण्याची तयारी भारताने केली होती. मात्र, लष्करी पातळीवरील चर्चेच्या फेऱयांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये सीमेवर शांतता असल्याचे दिसून येत होते. भारत आणि चीन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लडाख सीमेवरील तणाव आता कमी होण्याची संकेत मिळत आहेत. लडाख सीमेवरील वाद मिटला असला तरी डेपसांग प्लेन आणि डेमचोक सारख्या जुन्या फ्लॅश पॉईंट्सवर अजूनही तणाव कायम आहे. तरीही आता परस्पर समन्वयाने झालेल्या सैन्यमाघारीने सीमावर्ती भागात शांततेसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.









