धरणात 105.03 टीएमसी पाणी; दरवाजे साडे चार फुटांवर
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पडत असलेल्या पावसामुळे राज्याची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवरून साडे चार फुटावर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 41 हजार 281 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 1050 असे मिळून एकूण 42 हजार 331 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. परिणामी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर पलो होऊ लागले आहे. कोयना धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि सुरु असलेला पाऊस यामुळे कृष्णा, कोयना नदीला पूर आला असून कोयना नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, पाटण तालुक्यातील विविध विभागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे तालुक्यातील मोरणा- गुरेघर, साखरी- चिटेघर, वांग- मराठवाडी, महिंद, उत्तरमांड आणि तारळी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून हे प्रकल्पही ओव्हर फ्मलो झाले आहेत.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोयना 83 (4382), नवजा 102 (5338) आणि महाबळेश्वर येथे 122 (5708) मिलीमीटर पवासाची नोंद झाली असून धरणात प्रतिसेकंद 40 हजार 115 क्युसेक पाण्याची आवक सुरु असून पाणीसाठा 105.03 टीएमसी झाला आहे.
तर आणखी विसर्ग वाढणार…!
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पर्जन्य वृष्टी सुरु आहे. शुक्रवार सकाळ पासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी रात्री नंतर पावसाचा जोर वाढल्यास धरणातील आवकही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढण्याची शक्यता कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.